होमपेज › Konkan › ‘नाणार’ धमकी नको, भावना समजून घ्या : पवार

‘नाणार’ धमकी नको, भावना समजून घ्या : पवार

Published On: Apr 23 2018 11:12PM | Last Updated: Apr 23 2018 10:21PMकोल्हापूर : प्रतिनिधी

‘नाणार’ला विरोध झाला तर तो गुजरातमध्ये जाईल, अशी धमकी का देता, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केला. याप्रश्‍नी स्थानिकांच्या भावना समजून घ्या, असे आवाहन त्यांनी केले. ‘नाणार’ला दि.10 मे रोजी भेट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अजूनही कोठड्या रिकाम्या आहेत, या भाजप मंत्र्यांच्या वक्‍तव्याची वाट कशाला बघता, असा सवाल करत पवार यांनी खिल्ली उडवली.

‘नाणार’ प्रकल्पाविरोधात सर्वच राजकीय पक्षांत चढाओढ सुरू आहे, याबाबत पवार म्हणाले, आपण केवळ ‘नाणार’ची साईट बघायला जाणार आहोत. राज्याचे हित कशात आहे, कोकणाचे हित कशात आहे, हे पाहिले पाहिजे. ते पाहिले जाईल. दुसरी जागा असेल, तर त्या ठिकाणी प्रकल्प स्थलांतरित करता येईल का, हेदेखील पाहणे गरजेचे आहे.

एक लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प आहे. विरोध केला तर तो गुजरातमध्ये जाईल, अशी धमकी का देता, असा सवाल मुख्यमंत्र्यांना करत पवार म्हणाले, गुजरात असो अथवा कर्नाटक असो, ते काय पाकिस्तानात आहेत? ते देशातच आहेत. यामुळे धमकी देण्यापेक्षा स्थानिकांच्या संवेदना जाणून घ्या, त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.

सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर फूट पडली आहे, याबाबत विचारता पवार म्हणाले, लोकशाहीत कोणालाही अर्ज भरता येतो. त्यानुसार अर्ज भरले असतील. पण फाटाफूट झाली तर मराठी भाषिक अनेक वर्षांपासून जी अपेक्षा करतोय, त्याची फसवणूक होतेय असे होईल. आपण काँग्रेससोबत आहोत मात्र, कर्नाटकात सीमा भागाचा त्याला अपवाद आहे असेही पवार यांनी सांगितले.