Thu, Dec 12, 2019 08:32



होमपेज › Konkan › रत्नागिरी विमानसेवेला गती : मुख्यमंत्री फडणवीस

रत्नागिरी विमानसेवेला गती : मुख्यमंत्री फडणवीस

Published On: Mar 06 2019 1:02AM | Last Updated: Mar 06 2019 1:02AM




कुडाळ : प्रतिनिधी

एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात रत्नागिरी जिल्ह्याच्या विमानतळाबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या झाल्यामुळे विमानसेवेलाही आता गती  मिळेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सिंधुदुर्ग विमानतळाच्या (चिपी) टर्मिनल इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. 

महामार्ग रुंदीकरण, बंदर विकास, मत्स्यव्यवसाय विकास, पर्यटन, हवाई सेवा या माध्यमातून विकासाची मोठी भरारी घ्यायला सिंधुदुर्ग जिल्हा सज्ज झाला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मंगळवारी एका शानदार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री दीपक केसरकर, 
खा. नारायण राणे, खा. विनायक राऊत, आ.निरंजन डावखरे, आ. बाळाराम पाटील, आ. वैभव नाईक, आ. नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक  एन. वासुदेवन आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी ‘चांदा ते बांदा ’अंतर्गत लाभार्थींना प्रमाणपत्र वितरण तसेच विविध प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा व विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. 

विमानतळामुळे विकासाची गती तिप्पट

 जिल्ह्यातून जाणारा रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग यामुळे विकासाचा वेग वाढतो. तथापी जिल्ह्यात अद्ययावत विमानतळाद्वारे प्रवासी व माल वाहतुकीची विमान सेवा सुरू झाली तर विकासाचा वेग तिप्पट होतो असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, चिपी विमानतळाच्या परवानग्या मिळविण्यासाठी अनेक अडचणी होत्या. पण नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी विशेष परिश्रम घेऊन या विमानतळाच्या परवानग्यांचा मार्ग सुकर केला. दररम्यान ,गेल्या चार वर्षांच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्‍न 71 हजारांवरुन एक लाख 40 हजारांपर्यंत गेले आहे. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

चिपी विमानतळ हा पर्यायी विमानतळ म्हणूनही उत्तमप्रकारे काम करु शकेल असे ते म्हणाले. एअरपोर्ट अ‍ॅथॉरेटी ऑफ इंडिया व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात रत्नागिरी जिल्ह्याच्या विमानतळाबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या झाल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील विमानतळासही आता चालना मिळेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

सी वर्ल्ड प्रकल्प लवकरच मार्गी

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासात महत्वपूर्ण ठरणारा ‘सी वर्ल्ड’ प्रकल्प रेंगाळला होता. पण जिल्ह्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वपूर्ण असल्याचा उल्लेख करुन ना. फडणवीस म्हणाले, हा प्रकल्प सहा महिन्यात मार्गी लावण्याचा प्रयत्न करु. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला मोठी चालना मिळेल. भारतातील पहिल्या सागरी बहुप्रजातीय मत्स्यबीज केंद्र वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथे होत आहे. यामुळे जिल्ह्याच्या मत्स्य व्यवसायामध्ये मोठे आर्थिक परिवर्तन होण्यास मदत होणार आहे. आनंदवाडी मासेमारी बंदरामुळे मत्स्य व्यावसायिकांना याचा मोठा लाभ होणार आहे.

कोकणात 22 हजार कोटींचे प्रकल्प 

कोकणाचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी शासनाच्या माध्यमातून कोकण विभागात 22 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प हाती घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.  मत्स्यव्यवसाय विभागामार्फत दोनशे पंधरा कोटी रुपयांच्या विविध विकास योजना राबविण्यात येत आहेत. सिंधुदुर्गचे नैसर्गिक सौंदर्य कायम रहावं यासाठी प्रदूषणमुक्‍त व पर्यावरणपूरक उद्योग या जिल्ह्यात कसे येतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नीलक्रांती, सागरमाला या केंद्राच्या योजनांशी सांगड घालत मत्स्यव्यवसाय विभागाने कोकणच्या किनारपट्टीवर विविध विकासकामे सुरू केली आहेत.

‘चिपी’ वरुन लवकरच विमानसेवा ः ना. प्रभू 

केंद्रीय वाणिज्य व नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू म्हणाले,  सर्वांना आभिमान वाटावा अशी चिपी विमानतळाची उभारणी झाली आहे. उडान 3 मध्ये सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश नव्हता. तथापी या दोन जिल्ह्यातील क्षमतांचा विचार करता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मान्यतेने खास या दोन जिल्ह्यांसाठी उडान 3.1 योजना सुरू करण्यात आली. त्यामध्ये सिंधुदुर्ग व  रत्नागिरी जिल्ह्यातील विमानतळांचा समावेश करण्यात आला आहे. लवकरच सिंधुदुर्ग विमानतळावरून विमानसेवा सुरू होईल,अशी ग्वाही त्यांनी दिली. ग्लोबल एव्हीएशन समिट अंतर्गत व्हीजन 2040 या संकल्पनेद्वारे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या जाणार आहेत. या अंतर्गत विमानांचे सुट्टे भाग निर्मितीचे कारखाने युवक-युवतींना विशेष प्रशिक्षण हे उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.

आडाळी एमआयडीसात कृषी उद्योगाना प्राधान्य ः ना. देसाई        

  सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगार निर्मितीस चालना मिळावी यासाठी  आडाळी, ता. दोडामार्ग येथे औद्योगिक क्षेत्र विकसित केले जाणार असल्याचे  उद्योग मंत्री सुभाष देसाई  यांनी सांगितले. आडाळी औद्योगिक वसाहतीत कृषि उद्योगावर आधारित उद्योगांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच प्रदूषणमुक्‍त व पर्यावरणपूरक  उद्योगच याठिकाणी उभारले जाणार आहेत. याबाबत नुकतेच गोवा येथे गोवा राज्य तसेच पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांची परिषद घेण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने उद्योजकांनी आडाळी एमआयडीसीसाठी होकार देण्याबरोबरच भूखंड घेण्यासही तत्परता दाखवली आहे.

मत्स्य उत्पादन व मत्स्य विकासात देशात महाराष्ट्र राज्य पाचव्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट करुन ते म्हणाले मत्स्य बिजाची उपलब्धता, बंदरांचा विकास, मत्स्य व्यावसायिकांना आधुनिक साधनांचा पुरवठा यावर भर देण्यात येऊन मत्स्य क्षेत्रात राज्य आघाडीवर नेण्याच संकल्प असल्याचे ना. जानकर म्हणाले.

पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सर्वांचे ऋण व्यक्‍त केले.  चांदा ते बांदा योजनेमुळे येत्या सहा महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट होणार आहे. या योजनेतील कृषि यांत्रिकीकरणामुळे आणि ‘श्री’ भात लागवड पद्धतीचा वापर केल्याने जिल्ह्याची भात उत्पादन क्षमता दुप्पटीने वाढली आहे. योजनेमुळे पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय व दुग्धोत्पादन तसेच काथ्या प्रक्रियामुळे ग्रामिण भागातील महिला तसेच

शेतकर्‍यांच्या आर्थिक उन्नतीस खर्‍या अर्थाने चालना 

सिंधुदुर्ग विमानतळावरून लवकरच प्रवासी वाहतूक सुरू व्हावी अशी अपेक्षा व्यक्‍त करुन खा. नारायण राणे म्हणाले, राज्याच्या महसुलात भर टाकण्याची क्षमता सिंधुदुर्ग जिल्ह्यात निश्‍चितच आहे. आनंदवाडी बंदराचे देखील लवकरात लवकर काम पूर्ण करून मत्स्यव्यावसायिकांना शासनाने दिलासा द्यावा. खा. विनायक राऊत यांनी उडान योजनेत समावेश झाल्याने सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाला गती मिळणार असल्याचे सांगितले.प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले.

या समारंभात उभादांडा मत्स्यबीज केंद्राचे भूमिपूजन, आनंदवाडी मासेमारी बंदराचे भूमिपूजन, सिंधुदुर्ग पोलीस कर्मचार्‍यांना मालकी घराचे वाटप, सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या सी.सी.टी.व्ही प्रकल्पाचे लोकार्पण, देवगड पवनचक्‍कीचे लोकार्पण, चांदा ते बांदा अंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या कुक्कु टपालन, दुग्धोत्पादन व शेळीपालन योजनांच्या लाभार्थ्यांना मंजूरी पत्रांचे वाटप, चांदा ते बांदा अंतर्गत कृषि विभागामार्फत कृषि औजारांचे वाटप, चांदा ते बांदा अंतर्गत बंधार्‍यांचे भूमिपूजन, श्री पद्धतीने भाताची लागवड करुन विक्रमी उत्पादन घेतलेल्या शेतकर्‍यांचा सत्कार, श्रमयोगी मानधन योजना लाभार्थ्यांना कार्डचे वाटप, पीएम-किसान योजना लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप, आयुष्यमान भारत योजनांचे प्रमाणपत्र वाटप आदी कार्यक्रम झाले.

माजी आ. राजन तेली,  भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, अजित गोगटे, पुष्पसेन सावंत ,  अतुल काळसेकर, संदेश  पारकर, मानव साधन विकास संस्थेच्या उमा प्रभू, दिपाली म्हैसकर, सुधाताई म्हैसकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम तसेच चिपी व  परुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थ व जिल्ह्यातील नागरिक  उपस्थित होते.