Fri, May 24, 2019 20:31होमपेज › Konkan › ‘सिव्हिल’चे डॉक्टर त्याच्यासाठी ठरले देवदूत!

‘सिव्हिल’चे डॉक्टर त्याच्यासाठी ठरले देवदूत!

Published On: Jan 17 2018 1:58AM | Last Updated: Jan 16 2018 10:00PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : विशाल मोरे

जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या सेवेबाबत नेहमीच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जाते. डॉक्टरांची रिक्‍त पदे, अपुरी यंत्रणा यामुळे रुग्णांना सेवा देण्यात नेहमीच अडचण येत असते. अशा परिस्थितीत नोव्हेंबर महिन्यापासून 65 टक्के भाजून मृत्यूशी झगडणार्‍या रुग्णावर दोन महिने उपचार करून त्याला वाचवण्याचे कार्य शल्य चिकित्सक आणि अधिपरिचारिका यांनी केले. त्यांच्या मेहनतीमुळेच या रुग्णाला नवा जन्म मिळाला आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील सेवेबाबत नेहमीच ओरड केली जाते. पण काही प्रसंगात डॉक्टर देवासारखे धावून आल्याने रुग्णांचे प्राणही वाचले आहेत. चिपळूण तालुक्यातील मुरादपूर येथे वास्तव्याला असणारा मूळचा आगरनरळ येथील येथील गणेश पडवळ या तरुणाने नोव्हेंबर महिन्यात घरगुती कारणामुळे स्वतःला पेटवून घेतले होते. त्याची पत्नी आणि नातेवाईकांनी त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. या घटनेत हा तरूण 65 टक्के भाजला होता. उपचारादरम्यान या तरुणाची परिस्थिती गंभीर होती. त्या तरुणाने जीवनाची आशा सोडली होती. पण डॉक्टरांनी हार मानली नाही. शल्य चिकित्सक डॉ. ज्ञानेश विटेकर यांनी त्याच्यावर उपचार सुरू केले.  अधिपरिचारिका एस. एस. भोजे आणि जे. सी. धनावडे यांनी त्या रुग्णाची सेवा शुश्रूषा केली. यामुळे हळुहळू त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. 

उपचाराला प्रारंभ केल्यानंतर काही दिवसांतच त्यात बदल जाणवू लागले. उपचारामुळे महिनाभरानंतर हा रूग्ण बेडवरून उठून चालू लागला. त्याची प्रकृती बरी झाल्याने त्याला सोमवार दि. 15 रोजी डिस्चार्ज देण्यात आला. आपल्या पतीला जीवनदान देणार्‍या डॉक्टर आणि अधिपरिचारिकांचे त्याच्या पत्नीने साश्रू नयनांनी ऋण व्यक्‍त केले.

65 टक्के भाजल्यानंतर त्याचावर उपचार करण्याचे आव्हान डॉक्टरांसमोर होते. साधारणतः अशा रुग्णाला मुंबई किंवा कोल्हापूरला हलवले जाते. परंतु, आम्ही त्या रुग्णावर येथेच उपचार करण्याचे ठरवले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर यांच्या  मार्गदर्शनाखाली आणि अधिपरिचारिकांच्या सहकार्याने त्या रुग्णावर उपचार केले. यातून तो बरा झाल्याचे समाधान लाभले, अशी प्रतिक्रिया डॉ. विटेकर यांनी दिली.

यापुढेही सहकार्य
या भाजलेला तरुणाच्या प्रकृतीत सुधारणा होऊन त्याला डिस्चार्ज देण्यात आला असला तरी त्याला पूर्ण बरे वाटेपर्यंत सहकार्य करू. त्याच्या मानेची त्वचा जळाली असून तेथे प्लास्टिक सर्जरी करणे आवश्यक आहे. यासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्‍वासन त्या रुग्णाच्या नातेवाईकांना डॉ. ज्ञानेश विटेकर यांनी दिले.