Sat, Dec 07, 2019 14:37होमपेज › Konkan › खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना अटक

खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना अटक

Published On: Jul 10 2019 1:40AM | Last Updated: Jul 09 2019 11:16PM
खेड : प्रतिनिधी

राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अभियंता आर. के. बामणे व महाडचे उपविभागीय अभियंता प्रकाश गायकवाड यांना दमदाटी करून नवीन जगबुडी पुलाच्या रेलिंगला बांधल्याप्रकरणी खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना मंगळवार दि. 9 रोजी खेड पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने खेडेकर यांना मंजूर केलेला अंतरिम जमीन रद्द केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

शनिवार, दि. 29 जून रोजी नवीन जगबुडी पुलाच्या जोडरस्त्याला भगदाड पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर आ. संजय कदम व नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी भरणे नाका येथे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते. दरम्यान, आंदोलकांची भेट घेण्यासाठी घटनास्थळी दाखल झालेल्या राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अभियंता आर. के. बामणे व महाडचे उपविभागीय अभियंता प्रकाश गायकवाड यांना दमदाटी करून नवीन जगबुडी पुलाच्या रेलिंगला बांधण्यात आले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावेळी उपस्थित पोलिस कर्मचार्‍यांनी प्रसंगावधान दाखवून या अधिकार्‍यांची सुटका केली होती. 

या घटनेची तक्रार संबंधित अधिकार्‍यांनी पोलिसांत दिल्यानंतर नऊ आंदोलन कर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात संशयित म्हणून नगराध्यक्ष वैभव खेडेकर, विश्वास मुधोळे, संतोष पवार, रहीम युसूफ सहिबोले, सागर प्रकाश कवळे, सुनील सीताराम चिले, राजेश बाळू कदम, शाम तुळशीराम मोरे, प्रमोद भार्गव दाभीळकर, राजेंद्र जगन्नाथ खेडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
खेड पोलिसांनी 7 संशयितांना अटक केली असून नगराध्यक्ष वैभव खेडेकर, विश्वास मुधोळे व संतोष पवार या तिघांना न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. मंगळवारी न्यायालयाने त्यांचा जमीन रद्द केल्यानंतर खेड पोलिसांनी नगराध्यक्ष खेडेकर  व सहकारी विश्वास मुधोळे यांना अटक केली.