Fri, Jul 19, 2019 07:28होमपेज › Konkan › चिपळूण : काँग्रेसच्या आजच्या मेळाव्याकडे लक्ष

चिपळूण : काँग्रेसच्या आजच्या मेळाव्याकडे लक्ष

Published On: May 13 2018 10:22PM | Last Updated: May 13 2018 9:01PMचिपळूण : शहर वार्ताहर

प्रदीर्घ कालावधीनंतर चिपळुणात काँग्रेसचा जिल्हा मेळावा सोमवारी होत आहे. काँग्रेस पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांच्या नेतृत्वाखाली होणार्‍या या मेळाव्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रीत झाले आहे. या निमित्ताने रमेश कदम यांच्यावर जिल्हाध्यक्ष म्हणून राजकीय मैदानावर अष्टपैलू कामगिरी करण्याची  जबाबदारी आली आहे.

राजकीयदृष्ट्या संवेदनशिल असलेल्या व कोकणातील राजकीय केंद्रबिंदू असलेल्या चिपळुणात प्रदीर्घ कालावधीनंतर प्रथमच काँग्रेस पक्षाचा जिल्हा मेळावा होत आहे. माजी आमदार रमेश कदम यांच्यावर पक्षाने जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. पदाची जबाबदारी मिळताच कदम यांनी आपल्या होम पिचवर अल्प कालावधीतच जिल्हा काँग्रेसच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. 
चिपळूणचे राजकीय मैदान हे सर्व दृष्टीने संवेदनशिल व कोकणचे राजकीय केंद्र मानले जाते. या राजकीय मैदानावर विविध राजकीय पक्षांचे प्रमुख व नेत्यांच्या उपस्थितीत अनेक मेळावे व शिबिरे झाली. चिपळूणच्या राजकीय मैदानात बाजी मारणारा कोकणातील नेता आपल्या राजकीय आलेखाची कमान चढती ठेवतो, असे राजकीय विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. या गोष्टींचा विचार करता ज्या चिपळुणात सेना, राष्ट्रवादीचा उदय होण्यापूर्वी केवळ काँग्रेसचेच पूर्वांपार वर्चस्व होते. परंतु मध्यंतराच्या राजकीय परिवर्तनाच्या लाटेत सेना, राष्ट्रवादी, मनसे अशा व अन्य काही पक्षांची लाट कोकणकिनारी येऊन धडकली. 

दरम्यान, पक्षांतराच्या प्रवाहात कोकणातील राजकीय पक्षातील नेते, कार्यकर्ते सामील झाले. त्या पैकीच माजी आमदार रमेश कदम यांनीदेखील काँग्रेस सोडून राष्ट्रवादीच्या प्रवाहात प्रवेश केला. सुरुवातीला कोकणात कदम यांनी काँग्रेसमधील स्वकियांसोबत राष्ट्रवादी पक्षाला बळकटी दिली. दरम्यान तत्कालिन माजी आमदार भास्कर जाधव यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. कदम व जाधव असे दोन कट्टर व राजकीयदृष्ट्या एकमेकांविरोधात टक्कर देणारे नेते एकाच छताखाली आल्यामुळे पक्षांतर्गत कलह टोकावर पोहोचला. या कलहामुळे कदम यांनी मागील लोकसभा निवडणुकीत शेकापबरोबर राजकीय सलोखा केला. तो देखील काही काळच राहिला. शेकापमध्ये न जमल्याने त्यांना राष्ट्रवादीत पुन्हा परतावे लागले. मात्र, राष्ट्रवादीत ते अस्वस्थच राहिले. दरम्यान, न. प. सार्वत्रिक निवडणुक त्यांच्या नेतृत्वाखालील चिपळूण न. प.त पराभवाचा फटका बसला. हा सर्वात मोठा राजकीय आघात सहन करीत असतानाच त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला राम-राम करीत न.प.तील सत्ताधारी भाजप पक्षात प्रवेश केला. परंतु भाजपची विचारसरणी व कार्यपद्धती त्यांच्या पचनी पडू शकली नाही. त्यातच न. प.तील सत्ताधारी भाजपकडून सुरुवातीपासूनच कामकाजामध्ये सुरू असलेल्या घोटाळ्यांच्या चर्चेमुळे कदम यांची राजकीय पकड भाजपमध्ये घट्ट होऊ शकली नाही. कदम भाजपमध्ये गेले. मात्र, समर्थक त्यांच्यासोबत गेले नाहीत. अशा त्रिशंकू अवस्थेत सुमारे वर्षभर कदम यांनी राजकीय मैदानावर आपले अस्तित्त्व टिकविण्याचा प्रयत्न केला. मात्र, अस्वस्थ असलेल्या कदम यांनी अचानक भाजपला सोडचिठ्ठी देत मूळ काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रवेश करताच काही कालावधीत त्यांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात  आली. कदम यांच्यावर जबाबदारी दिल्याने राजकीय मैदानावर दुसर्‍या इनिंगला सुरुवात झाली आहे. 

ज्या चिपळूणच्या मैदानात काँग्रेस नगण्य म्हणून गणली जात आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतपत व एका सतरंजीवर बसतील एवढीच संख्या असलेल्या कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ज्याची हेटाळणी केली जात आहे अशा काँग्रेस पक्षाची धुरा कदम यांनी आपल्या ताब्यात घेतली आहे. वर्षभरातच लोकसभा, विधानसभा निवडणूक येऊ घातली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नगण्य असलेल्या काँग्रेसला पूर्वीचे सुगीचे दिवस दाखविण्याचे काम कदम यांना करावे लागणार आहे.

एकूणच राजकीय परिस्थिती पाहता जिल्हाध्यक्ष ते कार्यकर्ता अशाच सर्वच पातळीवर पक्ष बळकटीच्या कामासाठी रमेश कदम यांना अष्टपैलू कामगिरी करावी लागणार आहे. हे आव्हान कदम कसे पेलतात ते पहिल्यावहिल्या मेळाव्यातूनच स्पष्ट होईल.