Wed, Jul 15, 2020 23:11होमपेज › Konkan › सिनेटची पुनरावृत्ती ‘पदवीधर’ला होणार

सिनेटची पुनरावृत्ती ‘पदवीधर’ला होणार

Published On: Jun 22 2018 10:36PM | Last Updated: Jun 22 2018 10:20PMचिपळूण : खास प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत शिवसेनेने एकहाती वर्चस्व स्थापन केले. या विजयाची पुनरावृत्ती कोकण पदवीधर निवडणुकीत होईल, असा विश्‍वास बांधकाममंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.  चिपळूण येथे उत्तर रत्नागिरीतील पदवीधरांच्या जाहीर मेळाव्यात ते बोलत होते.

शहरातील बहादूरशेख नाका येथील पुष्कर सभागृहात शुक्रवारी दुपारी 12 वा. हा मेळावा झाला. यावेळी जिल्हाप्रमुख सचिन कदम, आ. सदानंद चव्हाण, आ. रवींद्र फाटक, संपर्कप्रमुख विजय कदम, जि. प.चे बांधकाम सभापती अण्णा कदम, माजी आ. बापू खेडेकर, युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य योगेश कदम आदी उपस्थित होते. 

ना. शिंदे म्हणाले की, कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पदवीधर निवडणुकीत प्रथमच शिवसेना उतरली आहे. त्यामुळे यावेळी या मतदारसंघावरची मक्तेदारी मोडीत काढू. सर्वत्र सत्तेवर असणार्‍या पक्षाला या निवडणुकीसाठी उमेदवार आयात करावा लागला. शिवसेनेचे संजय मोरे हे सर्वसामान्य कार्यकर्ता असून त्याने जनसामान्यांसाठी अनेक गुन्हे स्वत:वर नोंदवून घेतले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन न्याय दिला आहे. त्यामुळे मोरे यांना विजयी करण्याची जबाबदारी रत्नागिरी जिल्ह्यावर आहे. सिनेट निवडणुकीत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एकहाती यश मिळविले. पदवीधर निवडणुकीमध्ये देखील त्यांनी पुढाकार घेतला आहे. सर्वत्र त्यांच्या सभा झाल्या आहेत. त्यामुळे ही निवडणूकदेखील आम्हीच जिंकू. पालघर निवडणुकीत शिवसेनेचाच नैतिक विजय झाला आहे. तेथील मतदान यंत्रातील कृत्रिम बिघाडाबाबत न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. शिक्षक बदल्यांचा प्रश्‍न गंभीर आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी बोललो आहोत. आता आयात केलेल्या उमेदवारावराची अवस्था बिकट झाली आहे. त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे अनेक संस्थाना आमिषे दाखवली जात आहेत. मात्र, कोकणातील पदवीधर त्यांना, सहा वर्षे कुठे होतात? असा सवाल करीत आहेत.

युवा सेनेचे योगेश कदम यांनी प्रास्ताविकात, संजय मोरे यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. ते खेडचे सुपुत्र असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातून त्यांना सर्वाधिक मते मिळाली पाहिजेत, असे आवाहन करुन निवडणुकीच्या तयारीबाबत मार्गदर्शन केले.  या मेळाव्याला उत्तर रत्नागिरीच्या पाच तालुक्यांतील पदवीधर उपस्थित होते.  त्यानंतर साडवली येथेही प्रचारसभा झाली. यावेळी दक्षिण रत्नागिरीतील पदवीधर उपस्थित होते.