Tue, Apr 23, 2019 13:33होमपेज › Konkan › डोक्यात दगड घालून सरपंच महिलेचा खून 

डोक्यात दगड घालून सरपंच महिलेचा खून 

Published On: Aug 11 2018 10:33PM | Last Updated: Aug 11 2018 10:33PMचिपळूण : खास प्रतिनिधी

तालुक्यातील दसपटी  विभागातील कादवड येथील महिला सरपंचाचा खून झाल्याची खळबळजनक घटना घडली. चारित्र्याच्या संशयावरून झोपेत असताना डोक्यात जांभा दगड घालून पतीनेच हा खून केला आहे. यामध्ये सरपंच सोनाली दीपक जाधव (वय 35, रा. कातकरवाडी) यांचा मृत्यू झाला आहे. 

दरम्यान, गेल्या 24 तासांमधील चिपळूण तालुक्यात महिलेचा खून होण्याची दुसरी घटना आहे. त्यामुळे पोलिसांची झोप उडाली आहे. शहरातील मापारी मोहल्ला येथे गुरुवारी पत्नीचे डोके आदळून पतीने खून केल्याची घटना ताजी असतानाच कादवडमध्ये दुसरी घटना घडली आहे. याबाबत शिरगाव पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार मृत महिलेची मुलगी किरण दीपक जाधव (19)हिने शिरगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी पती दीपक जाधव याला अटक केली आहे.  ही घटना शनिवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. पती दीपक आणि पत्नी सोनाली यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून सतत खटके उडत होते. शुक्रवारी रात्रीही याच मुद्यावरून पती पत्नीत वाद झाला. मात्र, त्यानंतर ते झोपी गेले.  पती दीपक याने हाच राग मनात धरून शनिवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पत्नी सोनाली या गाढ झोपेत असताना घराबाहेरील जांभा दगड आणून तो झोपलेली पत्नी सोनाली हिच्या डोक्यात घातला. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर मार बसला.  या हल्ल्यात  सोनाली या बेशुद्ध पडल्या. यानंतर पतीने मारण्यासाठी वापरलेला जांभा दगड बाहेर टाकला. यावेळी आवाज झाल्याने वाडीतील काहींनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी जखमी सोनाली जाधव यांना दादर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, दवाखान्यात नेतानाच सोनाली जाधव यांचा मृत्यू झाला होता.     दरम्यान, सरपंच जाधव यांच्या मृत्यूची खबर शिरगाव पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. सोनाली जाधव यांना दोन मुले असून एक मुलगी परिचारिका आहे तर दुसरा मुलगा आहे. सह्याद्रीच्या कडेकपारीत राहणार्‍या कातकरी आदिवासी समाजातील हे कुटुंब आहे.या प्रकरणी पती दीपक जाधव याला अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक निशा जाधव करीत आहेत.