Sat, Apr 20, 2019 09:57होमपेज › Konkan › आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळल्या

आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळल्या

Published On: Jul 18 2018 10:41PM | Last Updated: Jul 18 2018 10:18PMचिपळूण : खास प्रतिनिधी

चिपळूण पोलिस व गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केलेल्या त्या चार चोरट्यांकडून आंतरराज्य चोर्‍या उघड होणार आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासात त्यांनी महाराष्ट्रासह  गुजरात व कर्नाटकमध्ये चोर्‍या केल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्याकडून वितळवलेले 175 ग्रॅम सोने जप्त केले आहे.

आठ दिवसांपूर्वी शहरात भर दिवसा घरफोड्या झाल्या. आलिशान गाडीतून येत चार चोरट्यांनी या धाडसी चोर्‍या केल्या. या गाडीचा नंबर पोलिसांना मिळाल्यानंतर गुन्हे अन्वेषण विभाग व चिपळूण पोलिसांनी या चोरट्यांना अटक केली. यामध्ये ज्ञानेश्‍वर आप्पादुराई शेट्टी, नासीरखान इसाकखान पठाण, मुकेश भागोजी बाळसराफ व रवी रामचंद्र शेट्टीयार या टोळक्याला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या चिपळूण पोलिस या प्रकरणी कसून तपास करीत असून या चोरट्यांनी राज्यासह परराज्यांत देखील धाडसी घरफोड्या केल्याचे पुढे येत आहे. यामध्ये राज्यातील रायगड, ठाणे, रत्नागिरी, सातारा, लातूर, नाशिक तसेच कर्नाटकमधील बेळगाव, बंगळूर, गुजरातमध्येही चोर्‍या केल्याचे उघड होत आहे. 

या संदर्भात नाशिक पोलिसांनी देखील चिपळुणात येऊन पोलिसांची भेट घेतली. नाशिक पोलिस या टोळीला चौकशीसाठी ताब्यात घेणार असल्याचे समजते. याआधी रत्नागिरी व खेड चोरीप्रकरणीदेखील चोरट्यांना ताब्यात घेतले जाणार आहे. शहरातील मार्कंडी व खेंड भागातील चोरीचीदेखील त्यांंनी कबुली दिली असून काही सुवर्णकारांचीही चौकशी होत आहे. 

या सुवर्णकारांनी चौघांकडून सोने घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. शहरातील मार्कंडी येथील चोरीप्रकरणी 140 ग्रॅम व खेंड येथील चोरीप्रकरणी 35 ग्रॅम सोने पोलिसांनी हस्तगत केले आहे. या चोरट्यांनी सुवर्णकारांच्या मदतीने सोने वितळवून त्याची लगड केली होती. त्या दोन लगडी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तसेच सुवर्णकारांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. अधिक तपास चिपळूण पोलिस करीत असून राज्यभरातील पोलिस या चोरट्यांना ताब्यात घेणार आहेत. शिवाय परराज्यातील चोर्‍याही उघड होणार आहेत. दरम्यान, गुरुवारी  चोरट्यांना येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे.