Sun, Aug 25, 2019 04:36होमपेज › Konkan › ‘पीआरसी’ला उपोषणकर्त्यांनी रोखले 

‘पीआरसी’ला उपोषणकर्त्यांनी रोखले 

Published On: Apr 27 2018 10:26PM | Last Updated: Apr 27 2018 10:03PMचिपळूण : खास प्रतिनिधी 

नांदिवसे प्रादेशिक नळपाणी योजनेचे वीज बिल भरून तातडीने पाणी सुरू करावे, या मागणीसाठी कळकवणे, ओवळी व वालोटी येथील ग्रामस्थांनी ‘पीआरसी’ला येथील पं. स. प्रवेशद्वारासमोरच रोखले. मात्र, समितीचे प्रमुख आ. बाळाराम पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत हा प्रश्‍न समितीच्या दौर्‍याच्या समारोपात निकाली काढू, असे आश्‍वासन दिले. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

तालुक्यातील ओवळी, वालोटी आणि कळकवणे येथील पाणीपुरवठा योजना वीजपुरवठा तोडल्याने गेले तीन महिने बंद आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या दिवसात येथील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या मुद्यावर तीन गावांतील लोक पंचायतराज समिती चिपळूण तालुका दौर्‍यावर येणार म्हणून  पं. स. कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळी 10 वाजता उपोषणाला बसले. माजी जि.प.सदस्य अशोक कदम, अमित कदम, यशवंत घाणेकर, गोपाळ मेस्त्री, वसंत घाणेकर, मनोहर घाणेकर आदी तिन्ही गावांतील ग्रामस्थ व महिला या उपोषणाला बसल्या. 

सकाळी साडेअकराच्या सुमारास पंचायतराज समिती चिपळूणमध्ये दाखल झाली. यावेळी महिला रिकामे हंडे घेऊन समितीला सामोर्‍या गेल्या आणि समितीला अडविले. मात्र, या समितीत असलेले शिक्षक आ. बाळाराम पाटील यांनी याची दखल घेत थेट उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी अशोक कदम यांनी या योजनेची समस्या कथन करून ग्रामस्थांच्या हितासाठी पाणी सुरु होणे गरजेचे आहे, असे सांगितले. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, सभापती पूजा  निकम, पं.स. सदस्य अबू ठसाळे, बाबू साळवी, पांडुरंग माळी, जि. प. सदस्या दिशा दाभोळकर आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी आपल्याला पाण्यासाठी भटकावे लागत आहे. महिलांना पाच कि. मी.वरून चालत पाणी शोधावे लागत आहे. जि. प. च्या आडमुठे धोरणामुळे ही योजना बंद आहे.  पाणीटंचाई असताना योजना बंद आहे. त्यामुळे आधी पाणी सुरु व्हावे, अशी मागणी केली. 

यावेळी आ. पाटील यांनी या योजनेचा प्रश्‍न ‘पीआरसी’च्या समारोपात निकाली काढतो, असे आश्‍वासन दिले. येथील काही लोकांनी रत्नागिरी येथे यावे, आपण हा विषय सोडवू, असे आश्‍वासन दिले.त्यामुळे हे उपोषण मागे घेण्यात आले.