Fri, Jul 19, 2019 07:04होमपेज › Konkan › महावितरणकडून नांदिवसेतील बाबू झोरेंना न्याय

महावितरणकडून नांदिवसेतील बाबू झोरेंना न्याय

Published On: Jan 19 2018 1:52AM | Last Updated: Jan 18 2018 10:00PMचिपळूण : प्रतिनिधी

तालुक्यातील नांदिवसे येथील बाबू झोरे यांच्या कुटुंबीयांना प्रशासनामुळे अखेर न्याय मिळाला आहे. त्यांच्या घरी वीजपुरवठा सुरू झाल्याने सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍यांनी आनंद व्यक्त केला आहे.
नांदिवसेतील काही गावकर्‍यांनी बाबू झोरे यांच्या कुटुंबीयांशी असहकार ठेवला होता. त्यांच्या घराकडे जाणारी वाट शिवाय त्यांच्या घरासाठीचा वीजपुरवठा होऊ नये म्हणून अडथळे आणले होते. जागा मालकांनी वीज खांबासाठी जागा देण्यास आडकाठी आणली होती. प्रशासनालाही जुमानले नाही. बाबू झोरे यांनी हा संघर्ष गेली अनेक वर्षे चालू ठेवला. उपोषणाचे इशारे दिले आणि अखेर त्यांच्या संघर्षाला चिपळूणचे तहसीलदार जीवन देसाई, शिरगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी, पोलिस कर्मचारी व महावितरण चिपळूणच्या अधिकार्‍यांनी भक्कम साथ दिली. त्यामुळे गावकर्‍यांचा असहकार मोडित काढत प्रशासनाने त्यांना वीजपुरवठा होण्यातील अडथळे दूर केले.

या दरम्यान आवश्यक तो पोलिस बंदोबस्त ठेवला होता. गेली आठ-दहा वर्षे बाबू झोरे यांच्या कुटुंबीयांचा मानसिक व शारीरिक छळ गावातील काही मंडळींनी केला. त्यांच्या कुटुंबींयांवर हल्ल्याचे प्रयत्न झाले. असे झोरे यांचे म्हणणे आहे. 

अखेर अनेक वर्षांच्या एका संघर्षाच्या भूमिकेतून त्यांनी पाठपुरावा करीत प्रशासनाच्या सहकार्याने आपल्या घरात वीजपुरवठा करून घेण्यास यश मिळविले. सामाजिक कार्यकर्त्यांनी झोरे यांच्या कुटुंबियांच्या हेळसांडीबद्दल आता पुढाकार घ्यायचे ठरविले आहे. प्रशासनाच्या या कार्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.