चिपळूण : शहर वार्ताहर
भीमा -कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ चिपळुणात आंबेडकरी संघटनांनी पुकारलेला बंद यशस्वी झाला. मात्र, या वेळी काढलेल्या निषेध मोर्चात किरकोळ दगडफेक व बाचाबाचीच्या प्रकार आणि दोन गाड्यांच्या काचा फोडल्यामुळे मोर्चाला गालबोट लागले. मोर्चामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. शिवाय शहरातील दैनंदिन व्यवहार ठप्प झाले.
भीमा कोरेगाव येथे दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे पडसाद राज्यभर उमटले. या घटनेचा निषेध करण्यासाठी ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन करण्यात आले. त्या नुसार बुधवारी सकाळी रिपब्लिकन संघटना शहरातील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ जमले. या नंतर सकाळी 10 वाजता बंद सुरु झाला. बाजारपेठ, एस. टी. रिक्षा, वडाप, ठप्प झाले. सकाळी एस.टी. गाड्या रद्द करण्यात आल्या.
बहाद्दूरशेख चौकात सकाळपासून आंबेडकरी अनुयायी मोठ्या प्रमाणात जमा होऊ लागले. ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने जमलेल्या लोकांनी चौकातच महामार्गावर ‘रास्ता रोको’ सुरु केला. सुमारे 4 हजार लोकानी चौकात ठाण मांडून निषेधाच्या घोषणा दिल्या. जमाव आणखी वाढू लागल्याने वाहतूक ठप्प झाली. या नंतर पोलिसांनी गुहागर बायपासमार्गे वाहतूक वळविण्यात आली. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली नाही.
रास्ता रोको सुरु असताना दोन खासगी वाहने गर्दीतून वाट काढण्याच्या प्रयत्नात होती. हे आंदोलनकर्त्यांच्या लक्षात येताच जमाव त्या वाहनांच्या दिशेने गेला आणि काहींनी या वाहनांवर लाथा -बुक्के तसेच काठीने मारा केला. त्यातील काहींनी वाहनाच्या काचांवर दगड मारून काचा फोडल्या. जमाव आक्रमक होताच पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर या गाड्या माघारी वळविण्यात आल्या.
या नंतर बहाद्दूरशेख चौकापासून निषेध तमोर्चा सुरु केला. मोर्चा सुरु होण्यापूर्वी शहरातील बाजारपेठ बंद होती. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरु होती हा मोर्चा शिवाजी चौकात आल्यावर काही काळ घोषणाबाजी झाली. या नंतर मोर्चा बाजारपेठेत वळला. तेथील जुना बस स्थानक परिसरात काही दुकाने सुरु असल्याचे लक्षात येताच दुकानावर दगडफेक केली. मात्र, जमावातील पुढार्यांनी व पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनुचित प्रकार टळला. मोर्चा बाजारपेठमार्गे पुन्हा तहसील कार्यालयाकडे वळला दरम्यान शिवनदीच्या नव्या पुला जवळ असलेले दुकान उघडे असल्याचा संशय येऊन जमावाने दुकान बंद करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला मात्र, पोलिस आणि पुढार्यांनी मध्यस्थी करून वातावरण शांत केले. त्यानंतर मोर्चा प्रांत कार्यालयाकडे गेला. त्या ठिकाणी पदाधिकार्यांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.
या वेळी राजू जाधव, महेंद्र कदम, सुभाष जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सायंकाळी चार वाजल्यानंतर मात्र तणावपूर्ण वातावरण निवळले.