होमपेज › Konkan › चिपळुणातील धनगरवाड्या तहानलेल्याच!

चिपळुणातील धनगरवाड्या तहानलेल्याच!

Published On: Mar 09 2018 11:28PM | Last Updated: Mar 09 2018 9:16PMसावर्डे : वार्ताहर

चिपळूण तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या टेरव, कोंडमळा, अडरे, अनारी, सावर्डे या पाच धनगरवाड्यांना तीव्र पाणीटंचाई भासू लागली आहे. परिसरातील झरे, डुरे, विहिरीतील पाणी आटल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अनेक कुटुंबांनी सावर्डे, कोंडमळा ठिकाणी स्थलांतर केले आहे. कोंडमळा सरपंच सविता घाणेकर व वाडीतील  ग्रामस्थांनी चिपळूण पंचायत समितीकडे टँकरची मागणी केली आहे. 

यावर्षी सावर्डे, कोंडमळा रानमाळावर पाल मारून उघड्यावर संसार मांडला आहे. मागील वर्षीपासून येथील विहिरीसाठी सभापती पूजा निकम या प्रयत्नशील आहेत. धनगरवाड्यांची भेट घेऊन त्यांनी वस्तुस्थिती जाणून घेतली होती. पंचायत समितीमधून टँकरद्वारे धनगर वस्तीला मे महिनाअखेर पाणीपुरवठा करण्यात आला होता. 

पाणी टंचाईचा प्रश्‍न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी सभापती पूजा निकम व  तहसीलदार जीवन देसाई यांनी नियोजित विहिरीसाठी पाहणी करून  प्रस्ताव केला आणि सीएसआर निधीमधून जिंदाल कंपनीकडून विहीर मंजूर झाली. 

या विहिरीचे कामही झाले. मात्र, पाण्याचा तितकासा स्त्रोत नसल्याने विहिरी कोरडी आहे. त्यामुळे तीव्र पाणी टंचाई भासत आहे. पाण्यासाठी धनगर बधावांची दाहीदिशा वणवण सुरु आहे. महिलांना मैलोन्मैल डोक्यावर हंडा घेवून पाण्यासाठी हिंडावे लागत आहे. एकीकडे पाण्यासाठी वणवण करावे लागत आहे, तर दुसरीकडे आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने पाण्याचे खासगी टँकरही मागवता येत नाही. 

सरपंच घाणेकर यांनी तहसीलदार, पंचायत समितीकडे पाण्याच्या टँकरची मागणी केली आहे. एकूणच नैसर्गिक झरे आटल्यामुळे धनगर वस्तीवर पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत.अजून पावसाळा सुरू होण्यास साडेतीन महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे ही पाणीटंचाई भीषण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर शासनदरबारी दखल घेण्याची गरज आहे. तरच लोकांना पाणी मिळेल.