Wed, Apr 24, 2019 15:30होमपेज › Konkan › दापोली, गुहागर ठरतेय ‘सी फेस डेस्टिनेशन’

दापोली, गुहागर ठरतेय ‘सी फेस डेस्टिनेशन’

Published On: Dec 05 2017 1:47AM | Last Updated: Dec 04 2017 11:08PM

बुकमार्क करा

चिपळूण : समीर जाधव

नाताळ आणि सरत्या वर्षाचा हंगाम आला की, अनेकांना गोवा दिसते. गोव्याला फिरायला जाण्याचा बेत ठरतो. मात्र, आता ‘सी फेस डेस्टिनेशन’ म्हणून पर्यटकांसाठी दापोली आणि गुहागर  ‘हॉट स्पॉट’ ठरू लागले आहे. मुंबई, पुण्यातील नोकरदारांची तर वन डे पिकनिकसाठीही दापोलीला पहिली पसंती मिळत आहे. गजबजाटापेक्षा शांत आणि सुंदर निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी हा हंगाम महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांचा ओढा वाढता आहे. 

डिसेंबर जवळ आला की, अनेक पर्यटक गोव्याच्या दिशेने जातात. परंतु, रत्नागिरी जिल्ह्याला देखील सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. निळेशार पाणी.. गार वारा..आडवळणाचे रस्ते.. गर्द झाडी.. नारळी-पोफळीच्या बागा अशा निसर्गसंपन्‍न प्रदेशात फिरणे म्हणजे स्वर्गसुखाचा आनंद मिळतो. अस्सल कोकणी निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी दापोली आणि गुहागरला पसंती मिळत आहे. दापोलीलगत हर्णै, आंजर्ले, वेळास येथे असलेले सुंदर समुद्रकिनारे आणि गुहागर शहराला लागूनच असणारा समुद्रकिनारा पर्यटकांना आकर्षित करीत आहे. जिल्ह्यात असणार्‍या समुद्रकिनार्‍यांपैकी सर्वात जास्त किनारा लाभलेले गुहागर हे एकमेव शहर आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटक अधिक आकर्षित होत आहेत. महानगरातील गर्दी, अस्वच्छता, गजबजाट यापेक्षा या किनार्‍यांवर स्वच्छ व सुंदर किनारा आणि पर्यटकांना शांती मिळत आहे. त्यामुळे दापोली आणि गुहागर येथील ‘सी फेस’ पर्यटकांच्या द‍ृष्टीने हॉट स्पॉट ठरत आहेत. आता तर वीकएण्डसाठी दापोली, गुहागरला येणार्‍यांची संख्या वाढत आहे.

सागरी महामार्गावरून प्रवास करताना स्वर्गसुख मिळते. पाजपंढरीतून आंजर्लेकडे जाताना हर्णैचा सुवर्णदुर्ग, कनकदुर्गचा इतिहास, कोकण कृषी विद्यापीठ, कड्यावरचा गणपती, हर्णैतील माशांचा लिलाव, गर्द झाडीत लपलेले आसूदचे केशवराज मंदिर आणि त्याठिकाणी जाण्यासाठी आठशे पायर्‍यांची कसरत पर्यटकांना सुखद धक्‍का देऊन जाते. त्याच पद्धतीने पन्हाळेकाझी लेणी, उन्हवरे येथील गरम पाण्याचे कुंड, देवाचा डोंगर पर्यटकांना खुणावतो. विशेष म्हणजे अलीकडे वेळास येथे याच हंगामात कासव अंडी घालण्यासाठी किनार्‍यावर येतात. ती पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात. त्यामुळे दरवर्षी येथे कासव महोत्सव भरतो. वेळास, आंजर्ले परिसरात घरगुती राहणे व जेवणाची व्यवस्था असल्याने पर्यटकांना अस्सल कोकणी, शाकाहारी व मांसाहारी मेजवानी मिळते. मिनी महाबळेश्‍वर म्हणून दापोलीची ओळख झाल्याने बोचरी थंडी आणि कोवळ्या उन्हात फिरण्याचा आनंद घेता येतो. पुढे दाभोळच्या चंडिका माता दर्शनानंतर फेरीबोटीचा आनंद घेत गुहागरकडे जाता येते. गुहागरमधील गोमंतकीय रचनेचे श्री व्याडेश्‍वर मंदिर, हेदवी येथील दशभूज लक्ष्मीगणेश, वेळणेश्‍वर येथील शिवमंदिर, प्रसिद्धी श्री दुर्गादेवी देवस्थान अशी महत्त्वाची ठिकाणे आहेत. समुद्रावर येऊन चिंब भिजण्यासाठी दापोली आणि गुहागर सुरक्षित ठिकाण आहे. फक्‍त पर्यटकांनी खबरदारीचा उपाय म्हणून मर्यादा पाळल्या पाहिजेत. या ठिकाणी अनेक लोकांचे अपघात झाले आहेत. पण मर्यादेत पर्यटनाचा आनंद घेतल्यास गुहागरचा समुद्रकिनारा आनंददायी आहे. 

दापोलीमध्ये मुंबई, पुण्याहून वन-डे पिकनिकसाठी येणार्‍या पर्यटकांचा ओघ वाढता आहे. रूचकर खानपानाची व्यवस्था व निवास व्यवस्था असल्याने पुणेकर दापोली ‘सी फेस’ वर खूष आहेत. गुहागरकडेही पश्‍चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पर्यटक वळत आहेत. अलीकडेच या मार्गावर वॉटर पार्क सुरू झाल्याने पर्यटकांसाठी आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे अस्सल कोकणी पर्यटनासाठी गुहागर व दापोलीचे ‘सी-फेस’ हॉट स्पॉट ठरत असून आता गोव्याऐवजी पर्यटक या ठिकाणांकडे वळत आहेत.