होमपेज › Konkan › सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन

सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन

Published On: Mar 13 2018 11:21PM | Last Updated: Mar 13 2018 10:45PMचिपळूण : शहर वार्ताहर

चिपळूण नगर परिषदेमध्ये ठेकेदारीवर असलेल्या सफाई कामगारांचे ठेकेदाराने सुमारे तीन महिन्यांचे मानधन थकविल्याने कामगारांनी मंगळवारपासून (दि. 13) काम बंद आंदोलन सुरू केले. परिणामी, शहरातील अर्ध्या भागातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे.

     शहरातील चिपळूण न. प. पासून खेंड महालक्ष्मीनगर, बायपास मार्ग, उक्‍ताड, गोवळकोट, पेठमाप, बाजारपेठ आदी अर्ध्या परिसरात साफसफाई करणे व घंटागाडीच्या माध्यमातून नागरी वस्तीमधील कचरा जमा करणे असे काम चिपळूण न.प.ने खासगी तत्त्वावर ठेकेदाराकडे दिले आहे. हे काम अहमदाबाद येथील राजदीप प्रोटेक्शन फोर्स या कंपनीकडे आहे. सद्य:स्थितीत संबंधित ठेकेदाराकडे एकूण 48 सफाई कामगार कार्यरत आहेत. 

शासन निर्धारित नियमाच्या रकमेनुसार रोजंदारीची प्रत्येक कामगाराची किमान रक्‍कम 270 रूपये, त्यामध्ये ठेकेदाराने प्रत्येक कामगाराच्या रोजंदारी रकमेमध्ये सुमारे 40 रूपये भविष्य निर्वाह निधीची रक्‍कम जमा करणे गरजेचे आहे. ही रक्‍कम मिळून 305 रूपये रोजंदारीची रक्‍कम चिपळूण न.प.कडून ठेकेदाराला अदा केली जाते. किमान वेतनामध्ये 40 रूपये भविष्य निर्वाह निधी कामगारांच्या वेतनातून रोजंदारीतून कपात करून किमान 230 रूपये रोज गृहीत धरला जातो. अशाप्रकारे केवळ रोजंदारीवर मजुरी करणार्‍या 48 कामगारांना गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कंपनीकडून रोजंदारीचे मानधन दिले गेले नाही. 

कामगार ठेकेदाराकडे वारंवार संपर्क करीत होते. मात्र, अहमदाबादमध्ये बसून चिपळूण न. प. त ठेका चालविणार्‍या कंपनीच्या ठेकेदाराने सफाई कामगारांकडे दुर्लक्ष केले. या दोन महिन्यांत ठेकेदाराने चिपळूण न.प.च्या आरोग्य विभागाशी संपर्कदेखील केला नाही किंवा घेतलेल्या ठेक्याच्या कामकाजाबाबत, सफाई कामगारांबाबत कधीही माहिती घेतली नाही. ठेकेदाराने कामाचे नियोजन मुकादमाच्या माध्यमातून कामकाज सुरू ठेवले. मात्र, या मुकादमांनी सफाई कामगारांना कोणत्याही प्रश्‍नाची उत्तरे योग्य पद्धतीने दिली नसल्याची खंत सफाई कामगारांनी व्यक्‍त केली. 

याबाबत आरोग्य विभागाकडून माहिती घेतली असता संबंधित ठेकेदाराने ठेकेदारीवरील कामगारांचा भविष्य निर्वाह निधी भरल्याची चलने न.प.कडे जमा केली नाहीत. त्यामुळे त्याची रक्‍कम रोखून धरण्यात आली आहे. शासन नियमानुसार प्रत्येक कर्मचार्‍याची भविष्य निर्वाह निधी भरल्याची चलने वेळेवर जमा करणे गरजेचे आहे, तर सप्टेंबर व ऑक्टोबर या कालावधीतील दीड महिन्यांचे वेतन न.प.कडून ठेकेदाराला देण्यात आले होते. उर्वरित काळानंतर चलने न जमा झाल्याने वेतन रोखल्याचे सांगितले जात आहे. 

ठेकेदाराने संबंधित कामगारांची सहा महिन्यांचा भविष्य निर्वाह निधी जमा केला नसल्याचे सांगितले जात आहे. याबाबत कामगारांकडे विचारणा केली असता, निधीची रक्‍कम जमा झाल्यावर तुम्हाला मोबाईलवर एसएमएस येईल, असे सांगण्यात आले. मात्र, आजपर्यंत असा मेसेज आम्हाला आलेला नाही, अशी माहिती दिली. एकूणच कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.