Tue, Mar 26, 2019 02:22होमपेज › Konkan › चिपळूणमध्ये चेन मार्केटिंगचा भूलभुलैया

चिपळूणमध्ये चेन मार्केटिंगचा भूलभुलैया

Published On: Aug 22 2018 12:57AM | Last Updated: Aug 21 2018 10:35PMचिपळूण : खास प्रतिनिधी

अलीकडे चेन मार्केटिंग हा शब्द बदनाम झाला आहे. जिल्ह्याची आर्थिक राजधानी असणार्‍या चिपळूण शहरात अनेक नवनव्या कंपन्या आल्या आणि स्थानिकांना गंडा घालून निघूनही गेल्या. ईडू, अर्न इंडिया या कंपन्यांची प्रकरणे ताजी असतानाच चिपळूण जवळील खेर्डी येथे अशाच एका कंपनीने बेरोजगार तरुण-तरुणींना भुरळ घातली आहे. नोकरीच्या आमिषाने अनेकजण यामध्ये अडकत आहेत.

‘नोकरी देतो’ अशी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरात करून तरुणांना आमिष दाखविले जात आहे. गेले कित्येक दिवस हा प्रकार खेर्डी येथे सुरू असून आता याबाबत तक्रारी होऊ लागल्या आहेत. खेर्डीतील या शाखेने राज्यभरातील मुलांना वेड लावले आहे. कर्नाटक, मध्यप्रदेश, प. महाराष्ट्र, नाशिक इथपासून कोकणातील अनेक मुले या जाळ्यात अडकली आहेत. 

प्रथम 1500 रुपये भरून ही कंपनी नोंदणी करून घेते आणि पहिल्या टप्प्यात चार दिवस ट्रेनिंगच्या नावाखाली मुलांना डांबण्यात येते. नोकरी करून उपयोग नाही. इतक्या शिक्षणाचा फायदा काय, व्यवसायाशिवाय प्रगती नाही, उद्योजक बना आदी विषयांवर या मुलांना हॅमरिंग केले जाते. सलग चार दिवस सातत्याने समुपदेशन होते. उद्योग करण्याशिवाय पर्याय नाही, असे सांगितले. मात्र, ही कंपनी काय उद्योग देणार हे पहिल्या चार दिवसांत सांगितलेच जात नाही. मुलांना या चार दिवसांत  मोबाईल वापरण्यावर मर्यादा येतात. कोणाशी संपर्क साधू दिला जात नाही. जो या प्रशिक्षणात सहभाग घेतो त्याच्याबरोबर सातत्याने वरिष्ठ असतात. चार दिवस ‘उद्योग’ या विषयाचा मारा करण्यात येतो. मात्र, कंपनीचे उत्पादन किंवा रोजगाराबाबत काहीच माहिती दिली जात नाही. 

एक बॅच चाळीस ते पन्नास मुलांची असते. यामध्ये मुलींचा देखील सहभाग असतो. दिवसभर लेक्चर झाल्यानंतर खेर्डीमधीलच काही रिकाम्या सदनिकांमध्ये एका सदनिकेत वीस मुलांना ठेवले जाते. त्याच सदनिकेत जेवण देण्यात येते. मात्र, या जेवणाचा दर्जाही सुमार असतो. चार दिवसांच्या कालावधीत अन्य कुणाशीही संपर्क करू दिला जात नाही. चौथ्या दिवशी तुम्हाला 9 ते 46 हजार रुपये भरावे लागतील. कंपनीची  उत्पादने विकत घ्यावी लागतील. ती घेतल्यानंतर आणखी पाच जणांना या कंपनीशी जोडावे लागेल. त्या लोकांनीही प्रशिक्षणानंतर पैसे भरावेत. त्यावर तुम्हाला कमिशन मिळेल. यातून हजारो, लाखो रुपये कमविता येतील, असे सांगितले जाते. 

नोकरीच्या आशेने आलेल्या मुलांची फसवणूक झाल्याचे उघड होत आहे. त्यामुळे या कंपनीविरोधात तक्रारी वाढू लागल्या आहेत. पोलिस प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.