होमपेज › Konkan › चौपदरीकरण २०१९ पर्यंत पूर्ण होणार

चौपदरीकरण २०१९ पर्यंत पूर्ण होणार

Published On: Sep 01 2018 1:46AM | Last Updated: Sep 01 2018 12:08AMचिपळूण : खास प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावर पडलेले खड्डे गणेशोत्सवापूर्वी भरावेत आणि रखडलेले चौपदरीकरण मार्गी लागावे, यासाठी आपण सायन ते सावंतवाडी असा दौरा करीत आहोत. रस्त्यावर खड्डे आहेत हे मान्य आहेत; मात्र 5 सप्टेंबरपूर्वी रस्ता वाहतुकीस योग्य होईल. डिसेंबर 2019 पर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होईल, असा ठाम विश्‍वास राज्याचे महसूल व सा. बां. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी चौपदरीकरणाचे काम करणार्‍या दहा कंपन्यांना रस्ता दुरुस्ती व चौपदरीकरणाबाबत कडक शब्दांत सूचना देण्यात आल्या आहेत, असे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
कापसाळ येथील शासकीय विश्रामगृह येथे ना. पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, आपण सकाळी सायनहून या दौर्‍यासाठी निघालो. खड्ड्यांची पाहणी आणि चौपदरीकरण अशा दोन टप्प्यांत ही पाहणी आहे. पहिल्या टप्प्यात सायन ते पनवेल या मार्गाची पाहणी करताना नऊ स्पॉट निश्‍चित करण्यात आले आहेत की, जेथे भरती, ओहोटीमुळे रस्त्याखालून पाणी जाते. त्यामुळे तेथे रस्त्याखाली सिमेंटचा स्लॅब देणे 

गरजेचे आहे. या कामाला 77 कोटी मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हे काम येत्या सहा महिन्यांत पूर्ण केले जाईल. त्यामुळे सायन ते पनवेल रस्ता सुस्थितीत होईल. या भागात आधीच्या कंपन्यांनी निकृष्ट काम केले असल्याने हा प्रश्‍न निर्माण झाल्याची कबुली त्यांनी दिली. 

महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर या दुसर्‍या टप्प्याचे काम सन 2011 पासून ठप्प आहे. अनेक ठिकाणचे भूसंपादन झालेले नाही. शिवाय कर्नाळा पक्षी अभयारण्यामुळे पर्यावरण खात्याची मंजुरी मिळत नव्हती. ती अलीकडेच मिळाली आहे. या ठिकाणी प्राणी, पक्षांना जाण्यासाठी भूमिगत मार्ग ठेवण्यात येणार आहे. शिवाय या टप्प्यासाठी नेमलेल्या सुप्रीम कंपनीला आता बाजूला करुन त्या ठिकाणी काही दिवसांतच दुसरी ठेकेदार कंपनी नेमण्यात येईल. त्यामुळे हा मार्गदेखील लवकरच पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.

इंदापूर ते झाराप या दहा टप्प्यांबाबत ते म्हणाले, 50 कि.मी.चे दहा टप्पे करण्यात आले असून वेगवेगळ्या दहा कंपन्या हे काम करीत आहेत. पावसाळ्यात रस्त्यांची देखभाल, दुरूस्ती ही त्यांची जबाबदारी आहे. चौपदरीकरण 2019 पर्यंत पूर्ण करुन घेण्यात येईल, असा विश्‍वासही ना. पाटील यांनी व्यक्त केला.

खड्ड्यांबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर ना. पाटील यांनी कंपनीचे नाव घेऊ नका. तुम्ही कोट करू नका असे उत्तर देत याआधीच्या सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाला निधीच दिला नाही. त्यामुळे उपलब्ध निधीत हे रस्ते झाले आहेत. त्यामुळे ही स्थिती आहे. आम्ही खड्डे दुरूस्तीचे टेंडर काढताना दोन वर्षांची हमी घेतो. त्यामुळे रस्ते वाहतूक सुरळीत होईल, अशी बगल दिली. यावेळी आ. सदानंद चव्हाण, जिल्हाध्यक्ष बाळ माने, डॉ. विनय नातू आदी पदाधिकारी उपस्थित होते.