Fri, Apr 19, 2019 12:40होमपेज › Konkan › पेढे-परशुराम देवस्थान जमीन इनामप्रश्‍न सुटण्याच्या मार्गावर

पेढे-परशुराम देवस्थान जमीन इनामप्रश्‍न सुटण्याच्या मार्गावर

Published On: Jul 19 2018 10:31PM | Last Updated: Jul 19 2018 10:30PMचिपळूण : खास प्रतिनिधी

पेढे, परशुराम येथील देवस्थान इनामप्रश्‍नी आ. सदानंद चव्हाण यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना केली. या सूचनेची दखल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली असून उत्तरादाखल चौपदरीकरण अंतर्गत संपादित होणार्‍या जमिनीचा 90 टक्के मोबदला कुळांना व दहा टक्के देवस्थानला देण्याबाबत ‘महसूल’चा प्रस्ताव आहे. 31 जुलै रोजी यासंदर्भात संघर्ष समिती व मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक होईल, असे सांगितले.

चिपळूण-संगमेश्‍वरचे आ. सदानंद चव्हाण यांनी पेढे-परशुराम येथील देवस्थान इनामचा प्रश्‍न विधानसभेत उपस्थित केला व लक्षवेधी मांडली. शेतकरी व कुळांना मालकी हक्क आणि जमीन संपादनाचा शंभर टक्के मोबदला मिळावा, अशी मागणी करुन येथील लोकांची व्यथा मांडली. राष्ट्रीय महामार्ग, कोकण रेल्वे, एमआयडीसी आदी प्रकल्पांसाठी या गावातील जमिनी शेतकर्‍यांसाठी संपादित झाल्या. मात्र, त्याचा मोबदला प्रलंबित आहे. या लोकांना प्रकल्पग्रस्त दाखलाही मिळत नाही. शिवाय विविध शासकीय योजनांचा लाभही घेता येत नाही. या अन्यायाला त्यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले आणि चर्चा उपस्थित करुन देवस्थान इनाम रद्द करुन कुळांना मालकी हक्क द्यावा, अशी मागणी केली. यावर ना. पाटील यांनी सभागृहात उत्तर दिले. आ. चव्हाण यांनी शंभर टक्के मोबदला मिळण्याबरोबरच जमिनीचा मालकी हक्क मिळावा, अशी आग्रही मागणी केली. यासाठी संघर्ष समिती आंदोलन करीत असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर महसूलमंत्री पाटील यांनी देवस्थान इनाम हा प्रश्‍न केवळ दोन गावांपुरता नसून संपूर्ण राज्यभर आहे. याबाबत राज्यव्यापी कायदा करण्याची गरज आहे, असे सांगितले.