Sun, May 26, 2019 10:40होमपेज › Konkan › लोटे ‘सीईटीपी’त स्थानिकांवर अन्याय

लोटे ‘सीईटीपी’त स्थानिकांवर अन्याय

Published On: Dec 07 2017 1:32AM | Last Updated: Dec 06 2017 11:30PM

बुकमार्क करा

चिपळूण : खास प्रतिनिधी

लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिकांना न्याय मिळत नाही. सर्व ठेकेदार बाहेरचे आहेत. काही मोजक्याच लोकांना दलाल बनविण्यात आले आहे, असा आरोप करीत आ. भास्कर जाधव यांनी ‘सीईटीपी’ प्रकल्पातील गैरव्यवहारावर जोरदार टीका केली. अनेक उद्योजकांची थेट नावे घेत त्यांच्यावर कडव्या शब्दात प्रहार केला. येथील मच्छीमार समाज हा अन्याय खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

लोटेतील प्रदूषणाच्या मुद्यावर आ. जाधव यांच्या नेतृत्वाखाली दर्यासागर उत्कर्ष भोई समाज मंडळाच्या वतीने बुधवारी (दि. 6) मोर्चा काढण्यात आला. आवाशी गुणदे फाटा येथून राष्ट्रवादीच्या कार्यालयापासून सकाळी 11 वा. मोर्चाला सुरुवात झाली. ‘एमआरडीसी’च्या अंतर्गत रस्त्यावरून ‘सीईटीपी’ पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला व त्या ठिकाणी सभा घेण्यात आली. यावेळी खेड-दापोलीचे आ. संजय कदम, जि. प.चे विरोधी पक्ष गटनेते विक्रांत जाधव, जि. प. सदस्य राजू आंब्रे, अजय बिरवटकर, पं. स. सदस्य जीवन आंब्रे, कार्याध्यक्ष सुरेश महाडिक, पप्पू चिकणे, संजय जाधव, कृषी उत्पन्‍न बाजार समितीचे उपाध्यक्ष सुरेश कांबळी, माजी अध्यक्ष अरविंद आंब्रे, हुसेन ठाकूर, अन्वर खान, गंगाराम इप्‍ते, भोई समाज व मच्छीमार उपस्थित होते.

यावेळी आ. जाधव यांनी ‘सीईटीपी’ चा मुद्दा उचलून धरला. औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांची नावे घेत त्यांच्यावर हल्‍ला चढविला. वाघाने शेळ्या खाल्ल्या, आता आलेले प्रभारीही तशीच पुनरावृत्ती करणार, अशा शब्दांत टीका केली. ते म्हणाले, ‘सीईटीपी’ त मोठा भ्रष्टाचार होत आहे. येथील उद्योजक आणि संचालकांवर त्यांनी जहरी शब्दांत निशाणा साधला. अनेक उद्योजक शिवसेनेचे दलाल आहेत. येथील दोघेजणही दलाली करीत आहेत. कारखाना व्यवस्थापन व ठेकेदार यांच्यात संगनमत असून कंपनी अधिकार्‍यांचा यामध्ये वापर होत आहे. अधिकार्‍यांच्या नातेवाईकांचा कंपनीच्या ठेक्यामध्ये हिस्सा आहे. ‘सीईटीपी’ चे काम निकृष्ठ असून काळ्या यादीतील ठेकेदाराला काम देण्यात आले आहे. सीईटीपीसाठी आघाडी सरकारने निधी दिला. मात्र, यापुढे भोई समाज गप्प बसणार नाही. त्यांच्यावरील अन्याय सहन केला जाणार नाही. त्यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पाठीशी ठाम राहील. स्थानिकांना नोकरी मिळाली पाहिजे. ठेकेदारी मिळाली पाहिजे. पंचक्रोशीला मोफत पाणी, आणखी रासायनिक कारखाने आणू नयेत यासाठी राष्ट्रवादी आग्रही राहील, असे स्पष्ट केले. यावेळी आ. संजय कदम यांनी युती शासनावर टीका केली. या मोर्चात शिव, आयनी, कोतवली, सोनगाव, घाणेखुंट आदी भागांतील ग्रामस्थांनी सहभाग घेतला.