Sun, May 26, 2019 19:02होमपेज › Konkan › बंदिस्त खोलीमध्ये एलईडीची दुरुस्ती

बंदिस्त खोलीमध्ये एलईडीची दुरुस्ती

Published On: Dec 04 2017 1:37AM | Last Updated: Dec 03 2017 11:15PM

बुकमार्क करा

चिपळूण : शहर वार्ताहर

इनडोअर स्टेडियममध्ये एलईडी दिव्यांच्या दुरूस्ती होत असल्याची पोलखोल  चिपळुणात स्थापन झालेल्या सुधार समितीच्या माध्यमातून समिती सदस्य माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी केली आहे. त्यामुळे चिपळूण नगर परिषदेच्या भोंगळ कारभार उघड झाला आहे.

न. प.समोरील स्व. अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलाच्या इनडोअर स्टेडियममध्ये शहरातील नादुरूस्त व बंद पडलेले एलईडी दिवे दुरूस्त करून वापरले जात असल्याची चर्चा गेले काही दिवस न. प. वर्तुळात सुरू होती. सुधार समितीने याचा माग घेतला असता, स्टेडियमच्या बंद खोलीत संबंधित ठेकेदाराचा तांत्रिक कामगार बंद पडलेले एलईडी दिवे दुरूस्त करण्याचे काम करीत असल्याची कुणकुण लागली. प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी सुधार समितीचे काही सदस्य व मुकादम यांनी त्या ठिकाणी अचानक शनिवारी भेट दिली. यावेळी संबंधित व्यक्‍ती आतमध्ये बंद पडलेले दिवे दुरूस्तीचे काम करीत असताना आढळून आली. मुकादम यांच्यासह काहीजण तेथे येत असल्याचे लक्षात येताच त्या कामगाराने स्टेडियममधून काढता पाय घेतला. याचवेळी मुकादम यांनी तेथील वस्तुस्थितीचे चित्रण करून छायाचित्रेही काढली. संबंधिताला याबाबत मुकादम यांनी माहिती विचारली असता, बंद पडलेले सुमारे 400 दिवे दुरूस्त करून शहरात पुन्हा बसविल्याची कबुली दिल्याचा दावा मुकादम यांनी केला आहे. 
दरम्यान, ही सर्व माहिती अपक्ष नगरसेवक राजेश केळसकर तसेच भाजपचे नगरसेवक व उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने यांच्या निदर्शनास येताच संबंधितांनी व शहर सुधार समितीच्या काही सदस्यांनी क्रीडा संकूल इमारतीचा ताबा असणारे न. प. कर्मचारी अनिल राजेशिर्के यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, न. प. विद्युत पर्यवेक्षकांनी स्टेडियममधील खोलीची चावी एलईडी सामान ठेवण्यासाठी द्यायला मागितली. तेथे असे काही चालेल याची आपल्याला कल्पना नाही. त्या नंतर संबंधितांनी तत्काळ पंचनामा करून कुलूप लावण्याची मागणी केली, तर प्रशासनाकडून शहरात केवळ अकरा दिवे असल्याचे भासविले जात असतानाच प्रत्यक्षात शेकडो दिवे बंद आहेत. त्यामुळे या संपूर्ण उघड झालेल्या प्रकारामुळे एलईडी संदर्भातील बोगस कारभारासह दर्जा व त्याच्या प्रमाणपत्राबाबत उपस्थित होणार्‍या शंकेला दुजोरा मिळत आहे. दुरूस्तीसाठी बेकायदेशिरपणे न. प. इमारतीचा वापर होत होता याची खात्री करून संबंधिताला प्रतिदिन दोन हजार या प्रमाणे दंडासह भाडे आकारावे, अशी मागणी होत आहे. एकूणच सुधार समितीने दिलेल्या पहिल्याच दणक्यामुळे हळूहळू न.प.च्या कारभाराचे नमुने जनतेसमोर येऊ लागले आहेत. दरम्यान, या प्रकरणात न.प.त बहुसंख्येने असलेल्या आणि विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावणार्‍या शिवसेना नगरसेवकांनी तोंडावर बोट ठेवले आहे.