Sat, Apr 20, 2019 15:50होमपेज › Konkan › कोकण विकासाला कृषी पर्यटनच राजमार्ग

कोकण विकासाला कृषी पर्यटनच राजमार्ग

Published On: Sep 04 2018 11:38PM | Last Updated: Sep 04 2018 11:07PMचिपळूण : खास प्रतिनिधी

कृषी पर्यटनाचा राजमार्ग अवलंबल्यास कोकणचा शाश्‍वत विकास झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी पारंपरिक शेतीची पद्धत बाजूला ठेवली पाहिजे. तरच कोकण विकासाच्या मार्गावर येईल, असा विश्‍वास ज्येष्ठ कृषी पर्यटन तज्ज्ञ प्रभाकर सावे यांनी व्यक्त केला.  

सह्याद्री शिक्षण संस्थेच्या चिपळूण तालुक्यातील खरवते येथील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयात कोकण कृषी पर्यटन परिषदेचे मंगळवारी आयोजित करण्यात आले होते. यावेळी उद्घाटनावेळी  सावे म्हणाले की, गेल्या काही वर्षांत कृषी पर्यटनास अच्छे दिन येत आहेत. निसर्गसंपन्न कोकणात आंबा, नारळी, पोफळीच्या बागांत कृषी पर्यटन विकसित करता येईल. कोकणात शासनाने अनुदान दिल्यास या व्यवसायाला बळ लाभेल, असे ही त्यांनी सांगितले. 

यावेळी ‘मार्ट’चे अध्यक्ष बाळासाहेब बराटे, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप, रत्नागिरी बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक बी. व्ही. एस. अच्युतराव, यशवंतराव प्रतिष्ठानचे कोकण विभागीय अध्यक्ष शेखर निकम, कोकण भूमी प्रतिष्ठानचे प्रमुख कार्यवाह संजय यादवराव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी भविष्यात शेती व्यवसाय किफायतशीर होणार आहे. त्यातून कोकणला नवी दिशा मिळेल, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कोकण विभागाचे अध्यक्ष शेखर निकम यांनी व्यक्त केले. कोकणचा मध्यबिंदू असणारे सावर्डे हे कृषी पर्यटनाच्या बाबतीत महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. कोकणाला लाभलेला विशाल समुद्र, शैक्षणिक संकुल, डेरवण येथील रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अनेक पर्यटन स्थळे, तसेच तीर्थक्षेत्र याला कृषी पर्यटनाचा जोड दिल्यास कोकणाला नवी दिशा मिळेल, असे सांगितले. 
या परिषदेला कोकणातून कृषी पर्यटन विषयक काम करणारे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण दिवसभर कोकण कृषी पर्यटन विषयक परिसंवाद झाले.