होमपेज › Konkan › जलतरण तलावात सोडले अशुद्ध पाणी

जलतरण तलावात सोडले अशुद्ध पाणी

Published On: Apr 26 2018 11:04PM | Last Updated: Apr 26 2018 10:46PMचिपळूण : शहर वार्ताहर

चिपळूण न. प. मालकीच्या जलतरण तलावात रामतीर्थ तलावातील पाणी वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. खासगी तत्त्वावर चालविण्यात येत असलेल्या तलावात अशुद्ध पाण्याचा वापर होत असल्याने अनेक नागरिकांना त्यांचा त्रास जाणवत आहे. मात्र, याची येथील नगरपरिषद प्रशासन किंवा आरोग्य विभागाने दखल घेतलेली नाही.

शहरातील ‘रामतीर्थ’ या ऐतिहासिक तलावात काही वर्षांपूर्वी मातीचा भराव टाकून जलतरण तलाव बांधण्यात आला. सुमारे एक कोटी रुपये खर्चातून हा तलाव उभारला गेला. पंधरा वर्षांपूर्वी या तलावाची उभारणी झाली. शासनाकडून एक कोटी मिळतील या अपेक्षा व तत्कालीन सरकारच्या आश्‍वासनानंतर चिपळूण न. प.ने आपल्या फंडातील एक कोटी रुपये खर्च करुन पाण्याच्या तलावातच पोहण्याचा तलाव बांधण्याचा पराक्रम केला. ‘रामतीर्थ’ हा प्राचीन  तलाव असल्याने या तलावात भराव टाकून जलतरण तलाव उभारल्यास तो टिकणार नाही, अशी अनेक वास्तूविशारदांनी स्पष्टोक्ती दिली होती. त्यानुसार तलाव सुरू होण्यापूर्वी जलतरण तलाव ‘रामतीर्थ’ तलावाच्या गाळात रुतू लागला. त्यामुळे डागडुजीसाठी आजपर्यंत तीन ते चारवेळा करोडो रूपये खर्च करण्यात आले आहेत. तरीदेखील या तलावातून न.प.ला उत्पन्न मिळत नाही. 
दरम्यान, हा तलाव खासगी तत्त्वावर चालविण्यास देण्यात आला. मध्यंतरात ठेकेदाराने या तलावात पाणी साठविण्यासाठी चक्क रामतीर्थ तलावातील अशुद्ध पाणी पंपाद्वारे घेण्यास सुरुवात केल्याचा धक्कादायक प्रकार काही जागरुक नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यांनी संबंधितांकडे तक्रार दिली. मात्र, तलाव साफ करण्यासाठी हे पाणी वापरले जाते असे थातूरमातूर कारण सांगितले. वस्तुस्थिती पाहता या तलावात पोहण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या वेळेतच रामतीर्थ तलावातील अशुद्ध पाणी पंपाद्वारे आणण्यासाठी पाईपलाईन सातत्याने सुरू असल्याचे दिसून येते. सद्य:स्थितीत केवळ संबंधित ठेकेदाराकडून ‘रामतीर्थ’ तलावातील पाणी उचलून जसेच्या तसे जलतरण तलावात टाकण्याचे काम केले जात आहे. 

वास्तविक पाहता, जलतरण तलावासाठी चिपळूण न.प.कडून वेगळ्या प्रकारे पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच हे पाणी पुनर्वापर नियोजनाच्या माध्यमातून शुद्धीकरण यंत्रणेमार्फत शुद्ध करुन वापरणे गरजेचे आहे. असे असताना देखील या नियोजनाला बगल देत संबंधितांकडून ‘रामतीर्थ’ तलावातील अशुद्ध पाणी जलतरण तलावात साठवून त्या पाण्यातच नागरिकांना पोहण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. परिणामी, गेले काही दिवस अनेकांना त्वचेच्या आजारांचा त्रास होऊ लागला आहे. अंगावर पुरळ उटणे, डोळे झोंबणे, खाज सुटणे आदी आजारांचा त्रास जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्यांना जाणवत असल्याचे सांगितले जात आहे.