होमपेज › Konkan › ब्रिटिशकालीन अनेक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट कागदावरच!

ब्रिटिशकालीन अनेक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट कागदावरच!

Published On: Jun 13 2018 1:34AM | Last Updated: Jun 12 2018 10:36PMचिपळूण : समीर जाधव

सावित्री पूल दुर्घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने मुंबई-गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. यानंतर सलग दोन वर्षे रूद्र कन्सल्टन्सीने कोकणातील ब्रिटिशकालीन पुलांचे ऑडिट केले. मात्र, हे ऑडिट कागदावरच राहिले आहे. महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असताना राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पुलांवर खर्च केलेला नाही. त्यामुळे अतिवृष्टीच्या काळात पुलावरील वाहतूक धोकादायक ठरत आहे.

रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल अतिवृष्टीत कोसळला. यामध्ये मोठी जीवितहानी झाली. संपूर्ण देशभरात हा विषय गाजला. यानंतर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी घटनेची गंभीरता लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या माध्यमातून अवघ्या सहा महिन्यांत हा पूल उभा केला. याच वेळी राज्यभरातील ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय झाला. तीन टप्प्यांत हे ऑडिट करण्यात येत आहे. त्यातील दोन टप्पे पूर्ण झाले असून या पुलांबाबत 
रूद्र कन्सल्टन्सीने दिलेला अहवाल अद्याप कागदावरच आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने या अहवालाची दखल कोकणात तरी घेतलेली नाही.

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. या अंतर्गत महामार्गावरील पुलांचे नव्याने बांधकाम होत आहे. परंतु, गेले वर्षभर या पुलांचे काम ठप्प होते. असे असताना ब्रिटिशकालीन पुलांच्या डागडुजीबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाने दुर्लक्ष केले आहे. रूद्र कन्सल्टन्सी तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या स्थानिक अभियंत्यांनी पुलांच्या दुरूस्तीचे व डागडुजीचे अंदाजपत्रक केंद्राकडे पाठविले आहे. मात्र, याबाबत कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे अतिवृष्टीत या पुलावरुन अवजड वाहतूक बंद करावी लागत आहे. 

मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथील जगबुडी, चिपळुणातील बहादूरेशख पूल, संगमेश्‍वर शास्त्री नदीवरील पूल, बावनदी, राजापूर येथील अर्जुना आदी पूल ब्रिटिशकालीन आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या पुलांवरून वाहतूक करणे धोकादायक ठरत आहे. चौपदरीकरणातील पुलांची कामे संथगतीने सुरू असताना ब्रिटिशकालीन पुलांचे  मजबुतीकरण व दुरुस्ती करणे आवश्यक आहे. अन्यथा अतिवृष्टीत महामार्ग ठप्प होण्याचा धोका आहे.