Sat, Aug 24, 2019 23:15होमपेज › Konkan › भाजपने जनतेचा विश्‍वास गमावला

भाजपने जनतेचा विश्‍वास गमावला

Published On: Feb 04 2018 11:24PM | Last Updated: Feb 04 2018 9:11PMचिपळूण : प्रतिनिधी

केंद्रातील भाजप सरकारने ओबीसी व मध्यमवर्गीयांना अर्थसंकल्पात दुजाभाव केला आहे. धनदांडग्या उद्योगपतींचेच हे सरकार आहे. बजेटमध्ये गरिबांसाठी व शेतकर्‍यांसाठी आरोग्य विमा व हमीभावाच्या केलेल्या घोषणाही फसव्या असल्याची टीका खा. हुसैन दलवाई यांनी केली. सामान्य जनतेचा भाजपने विश्‍वास गमावला असून या मुद्यावर राज्यसभेत सरकारला जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चार वर्षांपूर्वी सामान्य जनतेला खोट्या अपेक्षा दाखवून भाजप सत्तेवर आली. परंतु चार वर्षांमध्ये सामान्य जनतेला काहीच मिळाले नाही. पूर्ण भ्रमनिरास झाला. आता समोर निवडणुका असताना आपण शेतकर्‍यांचे कैवारी असल्याचे दाखविणार्‍या, शेतमालाला दीडपट हमीभाव व गरिबांसाठी आरोग्य उपचार खर्चाची हमी देत आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी कशी करणार याबाबत मात्र सरकारलाच खात्री नाही. यामुळेही जनतचा भ्रमनिरासच होणार आहे. एकतर देशात बेरोजगारीचे मोठे संकट आहे. चार वर्षांत काही हजाराच्या पलिकडे हे सरकार रोजगार देऊ शकलेले नाही. आता शेती व छोटे उद्योगही बड्या लोकांच्या हातात देण्याचे कारस्थान सरकारने सुरू केले आहे. छोट्या उद्योजकाला नामशेष करून मूठभरांच्या हातात आर्थिक सत्ता देण्याचे सरकारचे कारस्थान आहे. शिक्षणपद्धतीतही हिंदुत्ववादी विचारांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले जात आहे. ज्यांनी या देशात जातीय व धार्मिक फुटीचे बीज रोवले अशा मंडळींचे अभ्यासक्रमामध्ये उदात्तीकरण करून नव्या पिढीला कोणते संस्कार दिले जाणार आहेत, असा सवाल त्यांनी केला. 
बजेटमध्ये सामान्य जनतेविषयी आपले देणेघेणे नसल्याचेच या सरकारने दाखवून दिले आहे. अल्पसंख्याकाना बजेटमध्ये नाकारण्यात आले आहे. मुस्लीम समाजासाठी केलेली 700 कोटींची तरतूद हज खर्चातील कपात करूनच इकडे वळविण्यात आली आहे. सरकारकडे गरीब शेतकरी, अल्पसंख्याक, ओबीसी समाजाविषयी कोणतीही ठोस भूमिका, अजेंडा नाही. देशाची आर्थिक व्यवस्था मनमोहनसिंग सरकारच्या काळात भक्कम होती. ती गेल्या चार वर्षांत पुरती ढासळली आहे. तरीही अर्थमंत्री साडेसात टक्के विकासदराचा आभास दाखवित आहेत. हा फसवणुकीचा प्रकार आहे. एकंदरीतच सर्वच आघाड्यांवर भाजप सरकारने देशातील जनतेची फसवणूक केली असून या सरकारला आपण राज्यसभेत जाब विचारू. सरकारचे ओबीसी, अल्पसंख्याक व सामान्य शेतकरी, छोट्या उद्योजकांविरुद्ध असलेले धोरण उघडे करू, असा इशाराही त्यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिला. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्रा. प्रकाश सोनावणे उपस्थित होते.