Sun, Nov 18, 2018 11:18होमपेज › Konkan › शंभूराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याने कसब्याचा इतिहास उजळणार

शंभूराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याने कसब्याचा इतिहास उजळणार

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 23 2018 9:00PMसंगमेश्‍वर : वार्ताहर

ज्या कसबा भागातील सरदेसाईंच्या वाड्यात दगाबाजीने पकडून हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजांना धर्मासाठी बलिदान द्यावे लागले त्याच कसब्यात शंभूराजांची खुण म्हणून केवळ अर्धपुतळा आहे. याच ठिकाणी आता शंभूराजांचा पूर्णाकृती देखणा पुतळा स्थानापन्न होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी याकामी पुढाकार घेतला असून या पुतळ्याचे कामही पूर्णत्वाकडे जात आहे.

 ज्या कसब्यात शंभूराजांचे अनेक काळ वास्तव्य होते आणि ज्याला शंभूराजांच्या पराक्रमाची साक्ष म्हणून ओळख आहे, अशा कसब्यात राजांची आठवण म्हणून केवळ स्थानिकांनी बसवलेला एक अर्धपुतळाच उभा आहे. येथे येणार्‍या पर्यटकांना या पुतळ्याशिवाय काहीच दिसत नाही त्यामुळे कसब्याचा इतिहास केवळ पुस्तकांपुरताच मर्यादित राहिला आहे. 

जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्याकडे याबाबत माहिती गेल्यानंतर त्यांनी तातडीने या भागाची पाहणी करून येथे शंभूराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला मंजुरी दिली. त्यानुसार पालकमंत्र्यांच्याच आग्रहाखातर हे शिल्प बनविण्याचे काम अंधेरीतील प्रसिद्ध शिल्पकार जयप्रकाश शिरगावकर यांच्याकडे देण्यात आले. 

सध्या पुतळा उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या कामाची पाहणी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांनी पुतळ्यातील बारकावे पाहून शिल्पकारांना काही सूचनाही केल्या तसेच रवींद्र वायकर यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.

छत्रपती शंभूराजांच्या या देखण्या पुतळ्यामुळे कसब्याच्या ऐतिहासिक महत्त्वाला चांगले बळ मिळणार आहे. या वर्षभरातच हा पुतळा कसब्यात स्थानापन्न होणार आहे. या पुतळ्याप्रमाणेच या भागाचे ऐतिहासिक महत्त्व दर्शविणारे फलकही बसवण्यात येणार असून यासाठी या परिसराचे नव्याने सुशोभिकरणही करण्यात येणार आहे. त्यामुळे कसब्याचा इतिहास उजळणार आहे.