Fri, Apr 26, 2019 09:22होमपेज › Konkan › लोकांचे दान लोकांनाच मिळावे : बांदेकर 

लोकांचे दान लोकांनाच मिळावे : बांदेकर 

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 23 2018 9:52PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जलयुक्‍त शिवार योजना राबविताना अनेक भागांत गैरव्यवहार आणि अपहार झाला आहे.  मात्र, सिद्धिविनायक न्यासाने यासाठी राज्याच्या 34 जिल्ह्यांत 76 कोटी 50 लाखांचा निधी वितरित केला आहे. लोकांनी दिलेले दान लोकांनाच मिळावे, यासाठीच आम्ही आता बाहेर पडलो असल्याची  प्रतिक्रिया सिद्धिविनायक  गणपती न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी  येथे पत्रकार परिषेत व्यक्‍त केली.

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास प्रभादेवी, मुंबई यांनी जिल्ह्यातील जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत शिल्लक राहिलेल्या कामांसाठी एक कोटी रुपयांचा धनादेश जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्याकडे जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या उपस्थितीत श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी शुक्रवारी सुपूर्द केला.  

धनादेश वितरणानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आदेश बांदेकर यांनी राज्यभर वितरित करण्यात आलेल्या या निधीची फेरतपसणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. कोकणातील 5 जिल्ह्यांसाठी न्यासाने पाच कोटी निधी वितरित केला आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्याला तीन टप्प्यांत आतापर्यंत दोन कोटी 19 लाखांचा निधी दिला आहे. या निधीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे मागण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

न्यासाकडून 34 जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयांसाठी  साडेसात कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात  सात लाख रुपये डायलीसिस केंद्रासाठी देण्यात आले आहेत. याचा सर्व लेखाजोखा न्यासातर्फे मांडण्यात येणार आहे. यासाठी या निधीचे वितरण आणि खर्ची टाकलेल्या अहवालाची न्यास नोंद घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

न्यासातर्फे  महामार्गावर होणार्‍या अपघातातील रुग्णांना मदत करण्यासाठी ट्रॉमा सेंट्रर उभारण्यात येणार आहे. ही केंद्रे उभारताना त्याचा उपयोग पंचक्रोशीच्या परिघात व्हावा, यासाठी अशा ठिकाणांची पाहणी करण्यात येत आहे. तसेच पत्रकारांनाही आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांसह 25 हजार रुपयांची मदत न्यासातर्फे देण्यात येणार असल्याचे बांदेकर यांनी यावेळी सांगतले.

या कार्यक्रमाला आ. उदय सामंत, आ. राजन साळवी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा तसेच मंदिर न्यासाचे  कोषाध्यक्ष सुमंत घैसास, गोपाळ दळवी, संजय सावंत, विशाखा राऊत, अ‍ॅड. पंकज गोरे, सुबोध आचार्य, वैभवी चव्हाण, उपकार्यकारी अधिकारी  रवी जाधव आदी उपस्थित होते.