Sun, May 26, 2019 11:30होमपेज › Konkan › ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध

Published On: Feb 10 2018 1:32AM | Last Updated: Feb 09 2018 10:25PMबांदा :वार्ताहर

शहरातील भौतिक सुविधा व रोजगार गावातच निर्माण झाल्यास गावातील तरुण शहराकडे जाणार नाहीत. त्याच धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्र व देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकार प्रयत्नशील आहे. भविष्यात या माध्यमातून लाखो रोजगार निर्माण करून ग्रामीण भागालाही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. गेली कित्येक वर्षे रखडलेला बांदा-आरोसबाग येथील पुलाचे काम सुरू करण्यात आले असून बांदा शहरात लवकरच सुसज्ज विश्रामगृहाची इमारत उभारण्यात येणार असल्याचे आश्वासन महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बांदा येथे केले.

भाजपा आयोजित बांदा लोकोत्सव 2018 च्या तिरंगा रॅलीचे उद्घाटन मंत्री ना.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी टीम ऑटोमॅनियाक्सच्या रायडरनी रॅलीत सहभाग घेतला होता. माजी आमदार राजन तेली, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, जि. प. सदस्य राजेंद्र म्हापसेकर,तालुकाध्यक्ष महेश सारंग,पं. स. सदस्य शीतल राऊळ, मनोज नाईक,प्रभाकर सावंत, पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर,सरपंच मंदार कल्याणकर,लोकोत्सव समिती अध्यक्ष भाऊ वळंजू आदी उपस्थित होते.

स्वागत मंदार कल्याणकर यांनी केले. प्रास्ताविक अतुल काळसेकर यांनी केले. ना.पाटील म्हणाले, बांदा लोकोत्सव हा दर्जेदार कार्यक्रम आहे. समाजाच्या विकासासाठी कला महोत्सवही आवश्यक आहेत. नरेंद्र मोदी सरकार हे सामान्य लोकांसाठी अच्छे दिनचे सरकार आहे.भूमिहीन तसेच सर्वसामान्यांसाठी 2022 पर्यंत पक्की घरे देण्याचा उद्देश आहे. त्यासाठी देशात 2 कोटी घरांचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. देश उभारणीसाठी जनतेने भाजपाला साथ द्यावी,कारण आर्थिक शक्‍तीबरोबरच मनाची शक्‍तीदेखील गरजेची असल्याचे ना.पाटील यांनी स्पष्ट केले.

आंजिवडे घाटमार्ग सर्व्हेक्षणाचे आदेश

 कोकण व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा  आंजीवडे घाट रस्ता लवकरात लवकर व्हावा यासाठी आपण अधिकार्‍यांना तातडीने सर्व्हेक्षणाचे आदेश दिले आहेत.या घाटातील रस्त्याचा काही भाग हा वनखात्याच्या अखत्यारीत येत असल्याने याबाबत स्वतः लक्ष देणार आहे. आपले गाव हे पाटगाव- गारगोटी जवळच असल्याने आपल्याला कोकणात नेहमीच येण्यासाठी या घाट रस्त्याचा फायदा होणार असल्याने आपण या रस्त्याच्या कार्यवाहीबाबत लक्ष देऊ असे आश्वासन ना.पाटील यांनी दिले. सोनवडे घाट रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असून यासाठी 70 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.यामुळे कोकण व कोल्हापूर खर्‍या अर्थाने जवळ येणार असल्याची पुष्टी त्यांनी जोडली.

 मंत्र्यांची वाट बघू नका,रस्ते वाहतुकीसाठी खुले करा...

दोडामार्ग-बेळगाव मार्गावरील राम घाटाचे काम पूर्णत्वास आले आहे.मात्र हा रस्ता वाहतुकीसाठी अद्यापपर्यंत करण्यात आला नाही.प्रशासनाने रस्त्यांच्या उद्घाटनासाठी मंत्र्यांची वाट न बघता स्थानिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रस्ता वाहतुकीस खुला करावा असा आदेश आपण स्थानिक प्रशासनाला दिला असल्याचे ना.पाटील यांनी सांगितले.

बांद्यात पंचतारांकित विश्रामगृह उभारणार 

बांदा सरपंच मंदार कल्याणकर यांनी आपल्या भाषणात बांदा येथे सुसज्ज विश्रामगृह व्हावे अशी मागणी मंत्री ना.पाटील यांच्याकडे केली.त्यावेळी ना पाटील यांनी सांगितले की राज्यात नवीन विश्रामगृहे बांधायची नाहीत असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.प्रत्येक तालुक्यात विश्रामगृहे आहेत.मात्र त्यांची देखभाल होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.परंतु बांदा येथे विश्रामगृहाची गरज असल्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत खास मंजुरी घेऊन बांदा येथे पंचतारांकित शासकीय विश्रामगृह उभारण्याचे आश्वासन ना.चंद्रकांत पाटील यांनी दिले.