Mon, Mar 25, 2019 13:15होमपेज › Konkan › मत्स्यसंवर्धनासाठी चांदा ते बांदा योजनेतून निधी

मत्स्यसंवर्धनासाठी चांदा ते बांदा योजनेतून निधी

Published On: Apr 17 2018 1:52AM | Last Updated: Apr 16 2018 10:38PMमुंबई : प्रतिनिधी

मत्स्य व्यवसायाला अमर्याद संधी आहे. युवकांनी या क्षेत्रातील संधींचा लाभ घेऊन आपली प्रगती साधावी. कोळंबी, जिताडा तसेच खेकडा संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. त्यासाठी चांदा ते बांदा योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे मत्स्य व्यवसाय विकास मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले.

चांदा ते बांदा योजनेंतर्गत सिंधुदुर्ग तसेच चंद्रपूर जिल्ह्यात मत्स्य व्यसायाला चालना देण्याच्या अनुषंगाने मत्स्य व्यवसाय मंत्री जानकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. राज्यमंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते. व्हेनामी कोळंबीच्या बीज उत्पादन केंद्र (हॅचरी), खेकडा हॅचरीज, जिताडा मासा हॅचरीज व संवर्धन, खारे व गोड्या पाण्यातील पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन, मासेमारी जेट्टींचे आधुनिकीकरण याबाबत चर्चा करण्यात आली. 

राज्यात मोठ्या प्रमाणात जलक्षेत्र उपलब्ध असून सागरी किनार्‍यावरील मत्स्य पालनासाठीही उपयुक्‍त जागा उपलब्ध आहेत. कोळंबी, खेकडा, जिताडा माशांचे पालन तसेच पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धनासाठी उपलब्ध जागांची तांत्रिकदृष्ट्या पाहणी व व्यवहार्यता तपासून तत्काळ प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना जानकर यांनी दिल्या. 

शाश्‍वत रोजगारनिर्मिती: ना. केसरकर
चांदा ते बांदा ही योजना कोकण तसेच विदर्भातील जिल्ह्यांच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी योजना आहे. सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी यातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सर्वसामान्यांना शाश्‍वत रोजगार उपलब्ध होण्यासाठी मत्स्यसंवर्धनाच्या योजना उपयुक्‍त असून यासाठी भरीव निधी दिला जाईल, केसरकर यांनी सांगितले.