Sat, Jul 20, 2019 09:24होमपेज › Konkan › जिल्ह्यातील सव्वादोनशे गावे ‘कॅशलेस’

जिल्ह्यातील सव्वादोनशे गावे ‘कॅशलेस’

Published On: Jan 06 2018 1:23AM | Last Updated: Jan 05 2018 11:07PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : प्रतिनिधी

नोटाबंदीनंतर  ‘कॅशलेस’ व्यवहारांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी बँकांना सक्रिय करताना रत्नागिरी जिह्यातील 225 गावे कॅशलेस करण्यात आली आहेत. येत्या 26 जानेवारीपर्यंत 250 कॅशलेस गावांचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. यासाठी ‘चिल्लर’ नावाचे मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे.

रोख रकमेचा वापर कमी करून त्या ऐवजी कॅशलेस व्यवहारांवर भर देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कडक पावलेही उचलली जात आहेत. ग्रामीण भागामध्ये ही यंत्रणा सक्षम करण्यासाठी बँकांची मदत घेण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील 225 गावे कॅशलेस करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून नुकतेच बँकांना देण्यात आले आहेत. बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती सह. बँक, भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र यासारख्या मोठ्या बँकांना प्रत्येकी 10 गावे कॅशलेस करण्याची जबाबदारी देण्यात आली होती, तर छोट्या बँकांना पाच गावे कॅशलेस करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले  होते.

बँकांनी त्या-त्या गावांमध्ये जाऊन कॅशलेससाठी पावले उचलली. प्रागोगिक तत्त्वावर रत्नागिरी तालुक्यात बँक ऑफ इंडियाकडून निवळी येथे पहिल्यांदा हा उपक्रम सुरू करण्यात आला. स्वाईप मशीनचा तुटवडा असल्याने यासाठी ‘चिल्लर’ नावाचे अ‍ॅप उपलब्ध करण्यात आले आहे. या अ‍ॅॅपद्वारे कोणत्याही बँकेचा ग्राहक पैसे आदा करू शकतो. त्याची माहिती प्रत्येक व्यावसायिकाकडे देण्यात आली आहे. 

दरम्यान, पुढील टप्प्यात गावातील तरुणांनाही याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.  हे प्रशिक्षित तरुण गावात कॅशलेस व्यवहारांचा प्रसार करु शकतील. 26 जानेवारीपर्यंत 250  गावाचे उद्दिष्ट गाठण्याच्या द‍ृष्टीने बँकांची यंत्रणा कार्यरत करण्यात आल्याचे  प्रशासनाकडून सांगण्यात आले.