Tue, Jul 16, 2019 02:05होमपेज › Konkan › मच्छीमार हल्लाबोल प्रकरणी 30 जणांवर गुन्हा

मच्छीमार हल्लाबोल प्रकरणी 30 जणांवर गुन्हा

Published On: Feb 15 2018 1:56AM | Last Updated: Feb 15 2018 12:03AMमालवण (प्रतिनिधी)

मालवण येथील स्थानिक मच्छीमारांनी सोमवारी मध्यरात्री गोवा बेतुल येथील तीन पर्ससीन ट्रॉलर्स ला पकडून आणल्याचा पार्श्‍वभूमीनंतर बोट मालकांनी दिलेल्या तक्रारी नुसार मालवण येथील मच्छीमार नेते गोपीनाथ तांडेल व जोसेफ नरोना या दोघांसह 25 ते 30 जणांवर दरोडा मारहाण व धमकी प्रकरणी मालवण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. आज तांडेल व नरोना या दोघांना मालवण न्यायालयात हजर केले असता त्यांना 17 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या गुन्ह्याप्रकरणी वापरण्यात आलेली जोसेफ नरोना यांची बोट मालवण पोलिसांनी ताब्यात घेत या बोटींवरील सात खालाशांना चौकशी साठी ताब्यात घेण्यात आले आहे.

गेले अनेक दिवस सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर एलईडी मासेमारीवरील कारवाई साठी मच्छिमारानी सुरु केलेला संघर्ष सोमवारी शिगेला पोहचला. संतप्त मच्छीमारांनी सतरा वाव मध्ये मच्छीमारी करणार्‍या गोवा बेतुल येथील तिघा पर्ससीन नेट बोटींना पकडून मालवण बंदरात आणले होते. मच्छीमारांनी केलेल्या या कारवाई नंतर गोवा येथील बोट मालकांनी मालवण पोलीस स्थानकात मालवणच्या मच्छीमारांविरोधात खलाशाना मारहाण करून मासळीची लूट केल्याची तक्रार मालवण पोलीस स्थानकात केली होती. 

याप्रकरणी 25 ते 30 मच्छीमारांवर मंगळवारी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून मच्छीमारांची धरपकड सुरु असतानाच मध्यरात्री मच्छीमार नेते गोपीनाथ तांडेल व जोसेफ नरोना या ट्रॉलर्स मालकांना अटक करण्यात आली. स्थानिक मच्छीमाराना अटक केल्यानंतर आज दुसर्‍या दिवशी वातावरण तंग बनले होते. दिवसभरात दोन दंगा काबू पथके पोलिसांनी तैनात ठेवली होती.
आज सायंकाळी अटक करण्यात आलेल्या गोपीनाथ तांडेल व जोसेफ नरोना यांना मालवण न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी न्यायालय परिसरात मच्छीमारांनी गर्दी केली होती.

मासळी लूट प्रकरणी गुन्ह्यात वापरण्यात आलेली आरोपी जोसेफ नरोना याची बोट पोलिसांनी ताब्यात घेतली. तसेच या बोटीवरील सात खलाशाना देखील चौकशी साठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अशी माहिती पोलीस उप अधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी दिली आहे.

गोवा येथील पर्ससीन नेट मत्स्य विभागाच्या ताब्यात 
 मच्छिमारानी पकडलेल्या गोवा येथील तीन पर्ससीन नेट बोटी स्थानिक मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीकांत वारुंजीकर यांनी ताब्यात घेतले. सदर ट्रॉलर अवरुद्ध करून अनिश्‍चित कालावधी पर्यन्त ठेवण्याचा प्रस्ताव तहसीलदारांकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती वारुंजीकर यांनी दिली.

यापुढे पोलिसांना सहकार्य नाही 
एलईडी लाईट द्वारे अनधिकृत मासेमारी करणार्‍या बोटी स्थानिक मच्छीमारांनी पकडून देऊन पोलिसांना सहकार्य केले. मात्र पोलिसांनीच दुसर्‍यांच्या दबावापोटी स्थानिक मच्छीमारांचे आंदोलन दडपून टाकण्यासाठी स्थानिक मच्छिमारांवरच गुन्हे दाखल केले असून या कृतीचा आम्ही मच्छीमार निषेध करतो असे मच्छीमार नेते रविकिरण तोरसकर यांनी सांगितले. तसेच यापुढे मच्छीमारांकडून पोलिसांना कोणतेही सहकार्य केले जाणार नाही व सहकार्याची अपेक्षाही पोलिसांनी ठेऊ नये. पोलिसांच्या सागरी सुरक्षा दलातील सदस्यांनाही राजीनामे देण्यास सांगण्यात येणार आहे, असेही तोरसकर यांनी सांगितले.

अघोषित बंद 
स्थानिक मच्छीमाराना अटक केल्यानंतर मच्छीमार व्यावसायिकांनी अघोषित बंदची हाक दिली आहे.