Fri, Apr 26, 2019 03:40होमपेज › Konkan › आंतरराज्य वाहनचोर टोळीच्या मुसक्या आवळल्या

आंतरराज्य वाहनचोर टोळीच्या मुसक्या आवळल्या

Published On: Dec 26 2017 1:33AM | Last Updated: Dec 25 2017 10:42PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

डंपर चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने वाहन चोरी करणार्‍या आंतरराज्य टोळीच्या 23 डिसेंबर रोजी  कर्नाटकातील बंगळूर येथून मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून 10 लाख रुपये किमतीचा कोल्हापूर येथून चोरीस गेलेला डंपरही हस्तगत करण्यात आला आहे.

आदिल उल्‍ला सदाफ उल्‍ला खान (48, रा. दर्गा मोहल्‍ला, नीलमंगला बंगळूर, कर्नाटक),परवेज रहेमतुल्‍ला खान ऊर्फ हाजी(48, रा. शिवाजीनगर, बंगळूर) आणि हसहाक कुतुबद्दीन मुजावर(43, रा. सुभाष नगर कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. 19 नोव्हेंबर 2017 रोजी निवळी येथून डंपर चोरीस गेल्याची तक्रार ग्रामीण पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारचे आणखी 5 ते 6 गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे या गुन्ह्यांमध्ये आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याची  शक्यता वाटल्याने रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून तपास सुरु होता. दरम्यान, निवळीतून चोरीस गेलेला डंपर बंगळूर (कर्नाटक) येथे असल्याची गोपनीय माहिती या विभागाला मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

संशयितांची चौकशी केली असता त्यांनी रत्नागिरी शहर, देवरुख चिपळूण,रत्नागिरी ग्रामीण या पोलिस ठाणे हद्दीतून वाहन चोरी केल्याची कबुली दिली आहे. गुन्ह्यांच्या पुढील तपासासाठी सर्वांना रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रणय अशोक,अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, पोलिस निरीक्षक शिरीष सासने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रविराज फडणीस, पोलिस हेड काँस्टेबल संजय कांबळे, दीपक साळवी, राकेश बागुल, दिनेश आखाडे, उदय वाजे, मिलींद कदम, विजय आंबेकर, सागर साळवी, अमोल भोसले, चालक दत्ता कांबळे यांनी केली आहे.