Wed, Mar 27, 2019 04:06होमपेज › Konkan › अतिउत्‍साही पर्यटकांची कार समुद्रात अडकली 

अतिउत्‍साही पर्यटकांची कार समुद्रात अडकली (व्हिडिओ) 

Published On: Jul 02 2018 8:17PM | Last Updated: Jul 02 2018 8:17PMगिमवी : (गुहागर ) : लक्ष्मीकांत घोणसेपाटील  

साताऱ्याहून रत्नागिरीत आलेल्या पर्यटकांना अतिउत्साह चांगलाच अंगाशी आला. रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्राच्या पाण्यात गाडी घालू नका असे फलक लिहिले असताना देखील या पर्यटकांनी त्याकडे कानाडोळा केला आणि त्यांची गाडी समुद्राच्या पाण्यात फसली.

पर्यटकांना वारंवार सुचना करून देखील काही अतिउत्साही पर्यटक या सुचनांकडे पुर्णपणे दुर्लक्ष करतात. असेच दुर्लक्ष केल्याने पर्यटकांनी गाडी समुद्राच्या वाळूत घातली आणि  गाडी वाळूत रुतली. वाळूत रुतलेली गाडी भरतीच्या तडाख्यात सापडली त्यामुळे या पर्यटकांनी स्थानिक तरुणांकडून मदत मागितली. अखेर या तरुणांनी अथक प्रयत्न करून ही गाडी पाण्यातून बाहेर काढली. 

गणपतीपुळे समुद्रात गेलेल्या गाडीला बाहेर काढण्यात यश

प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रात सोमवारी चारचाकी गाडी अडकल्याने या गाडीला स्थानिक ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नाने पाण्याबाहेर काढण्यात यश आले. ही घटना दुपारी 12 वा.च्या सुमारास घडली.

सोमवारी गणपतीपुळे येथे दुपारी 12 वा.च्या सुमारास सातारा जिल्ह्यातील पर्यटकांची गाडी आली असता चालकाने थेट समुद्र चौपाटीवर गाडी नेण्याचा अतिउत्साही प्रयत्न केला. परंतु, हा अतिउत्साहपणा पर्यटकाच्या अंगलट आला. गणपतीपुळे येथील आपटातिठा येथून गणपतीपुळे स्मशानभूमीकडे जाणार्‍या मार्गाने ही गाडी समुद्र चौपाटीवर उतरवली असता प्रथम ही गाडी स्मशानभूमी समुद्र परिसरात रूतली. त्यानंतर ही गाडी चालकाने कशीबशी काढून पुन्हा समुद्र चौपाटीवर फिरवण्याचा अतिरेक केला. मात्र, खोल समुद्राच्या पाण्यात अडकल्याने अखेर या गाडीतील सर्वांनाच स्थानिक ग्रामस्थांकडे मदतीसाठी याचना करावी लागली. 

स्थानिक ग्रामस्थांनी माणुसकीच्या भावनेतून ही गाडी पाण्याबाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यामध्ये समुद्र चौपाटीवरील फोटो व्यावसायिक, जीवरक्षक, शहाळी विक्रेते आणि ग्रामस्थ यांचा समावेश होता. सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर ही गाडी पाण्याबाहेर आल्याने पर्यटकांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला.