Sun, Jul 21, 2019 01:26होमपेज › Konkan › कार नदीत पडून तिघांचा मृत्यू

कार नदीत पडून तिघांचा मृत्यू

Published On: Jun 28 2018 1:33AM | Last Updated: Jun 27 2018 9:05PMसंगमेश्‍वर : वार्ताहर

मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्‍वर तालुक्यातील गोळवली येथे लांजा ते पनवेल अशी जाणार्‍या इनोव्हाचा टायर फुटल्याने इनोव्हा गाडी रस्त्यावरून असावी नदीत गेली. या अपघातात तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी सकाळी 11.30 वाजता घडला. या घटनेत गाडीचा चालक बचावला. साडेसात तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह हाती लागले.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार इनोव्हा (एमएच-06/एडब्ल्यू-7779) लांजा ते पनवेल अशी जात होती. या गाडीत प्रगती पाटणे (40), चिंटू पाटणे (14), प्रभावती बेर्डे (60) असे प्रवासी होते, तर कार नितीन लक्ष्मण वाघमारे (30, रा. कळंबोली) चालवत होता. चिपळूण येथे राहणारे अमोल बेर्डे यांना मुलगी झाल्याने त्या बारशासाठी ही मंडळी लांजा येथे आली होती. कार्यक्रम झाल्यानंतर रात्री पनवेलला परतणार होती. परंतु, गेले 2-3 दिवस पावसाने उच्चांक गाठल्याने त्यांनी जाणे रद्द करून आपण सकाळी जाण्याचे ठरले. त्याप्रमाणे ही मंडळी सकाळी 10 वा. लांजा येथून निघाली व महामार्गावरील गोळवली या ठिकाणी आले असता गाडीचा टायर फुटल्याने गाडीवरील ताबा सुटल्याने कार उलटून नदीत कोसळली. 

पाऊस जास्त पडत असल्याने नदीला मोठ्या प्रमाणात पाणी होते. घातलेले बांधण हे एक पुरुष उंचीचे असून, त्यावरून पाण्याचा लोंढा वाहत आहे. चालक या गाडीतून बाहेर पडून तो बराच लांब वाहत जाऊन नदीच्या शेजारी असलेल्या झाडांचा आधार घेऊन त्याने आपला प्राण वाचवला, तर तीन प्रवाशी बेपत्ता होते. 

ही घटना समजताच काही मिनिटांतच येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन मदत कार्य करण्यास सुरुवात केली. ही घटना विवेक शेरे यांना समजताच त्यांनी संगमेश्‍वर पोलिस ठाण्याला कळवले. पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. ग्रामस्थ व पोलिस यांनी गाडी व प्रवासी यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असूनही पोहणार्‍या मंडळींनी आपल्या जीवाचा विचार न करता सहकार्य करण्यास सुरूवात केली. रात्रभर पडलेल्या पावसाने सर्वच नद्या तुडुंब वाहत होत्या. काही तास पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने मदतकार्य जोरात सुरू होते. तसेच देवरूखच्या राजू काकडे अ‍ॅकॅडमीला पाचारण करण्यात आले. ही मंडळी घटनास्थळी पोहोचली होती. सहा तासाच्या अथक प्रयत्नांनंतर गाडीचा शोध घेण्यात यश आले. त्यानंतर तब्बल दीड तासाने गाडी बाहेर काढण्यात आली. या गाडीतच तिन्ही मृतदेह होते.