Thu, Apr 25, 2019 06:17होमपेज › Konkan › संगमेश्‍वर तालुका आज बंद

संगमेश्‍वर तालुका आज बंद

Published On: Jul 26 2018 1:34AM | Last Updated: Jul 25 2018 10:29PMदेवरुख : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन भडकले असताना संगमेश्‍वर तालुका क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी (दि. 26)  संगमेश्‍वर तालुका बंदची हाक दिली आहे.

साडवली येथे सुभाष बने यांच्या निवासस्थानी क्षत्रिय मराठा समाज पदाधिकार्‍यांनी बैठकीत बंदची घोषणा केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एक मराठा लाख मराठा अशी सुरुवातीला घोषणा देऊन शांततेच्या मार्गाने मूकमोर्चे काढून झाले तरीही सरकारने याबाबत कोणतीच ठोस भूमिका न घेतल्याने पुन्हा ठोक मोर्चा काढून मराठा बांधवांनी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
संगमेश्‍वर तालुका क्षत्रिय मराठा 

समाजातर्फे गुरुवारी सकाळी देवरूख मराठा भवन येथे सर्व बांधव एकत्र येणार आहेत. तेथून संपूर्ण देवरूख शहरातून घोषणा देत ठोक मोर्चा काढण्यात येणार आहे. नंतर संगमेश्‍वर बसस्थानकाजवळ मुंबई-गोवा महामार्गावर मोर्चेकरी रास्ता रोको करणार आहेत. साखरपा विभाग व बावनदी विभाग त्या-त्या ठिकाणी महामार्ग रोखणार आहेत. संपूर्ण तालुक्यात हा बंद होणार असल्याने संगमेश्‍वर तालुक्यातील व्यापारी, रिक्षा, संघटनांना समाजातर्फे बंदला पाठिंबा देण्याबाबत पत्रे देण्यात आली आहेत. शासकीय यंत्रणेला या बंदबाबत कल्पना देण्यात आली आहे.

तालुका बंदची हाक दिल्याने व संपूर्ण मराठा समाज रस्त्यावर उतरणार असल्याने तालुक्यात एस टी सेवा, शाळा महाविद्यालयांवर याचा परिणाम होणार आहे. मराठा समाजाच्या वतीने आवश्यक त्या सेवा सुरळीत सुरु राहतील, असे सांगण्यात आले आहे. दवाखाने तसेच औषध विक्रीची दुकाने बंदमधून वगळ्यात आले आहे.संगमेश्‍वर, साखरपा, बावनदी हे प्रमुख मार्ग रोखण्यात येणार असल्याने संगमेश्‍वर तालुका शंभर टक्के बंद होणार असल्याचे सांगण्यात आले. या बंदसाठी रुपेश जाधव, संजय घाग, दिलीप सावंत, सुदेश साळवी, बाबा सावंत आदींनी पुढाकार घेत आहेत.