Sat, Jul 20, 2019 15:50होमपेज › Konkan › सकल मराठा समाजातर्फे आज जिल्हा बंदची हाक

सकल मराठा समाजातर्फे आज जिल्हा बंदची हाक

Published On: Jul 26 2018 1:34AM | Last Updated: Jul 26 2018 1:34AMकणकवली : प्रतिनिधी 

मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने गेल्या दोन दिवसांपासून राज्यभर तीव्रपणे आंदोलन केले. सिंधुदुर्गातही सकल मराठा समाजाने गरुवारी (दि. 26) सिंधुदुर्ग जिल्हा बंदची हाक दिली आहे. या बंदच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच तालुक्यांमधील समाजबांधवांनी व्यापार्‍यांसह सर्वांनाच या बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार या बंदला सर्वत्र उत्स्फूर्तपणे पाठिंबा देण्याची ग्वाही देण्यात आली आहे. या बंदच्या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून ठिकठिकाणी आवश्यक तो पोलिस बंदोबस्त तैनात ठेवला जाणार आहे. जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यात मनाई आदेश लागू केला आहे. तर सकल मराठा समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुहास सावंत यांनी हा बंद शांततेत पाळण्याचे आवाहन केले आहे.

मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण राज्यभर सकल मराठा बांधव रस्त्यावर उतरले आहेत. ठिकठिकाणी मंगळवारी बंद पाळण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा सकल मराठा समाजातर्फे गुरूवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक तालुक्यात नियोजन केले. पोलिस यंत्रणेनेही या बंदच्या पार्श्‍वभूमीवर बंदोबस्ताचे नियोजन करत अधिकारी, कर्मचार्‍यांची सज्जता ठेवली आहे. गुरूवारच्या पोलिस बंदोबस्तासाठी जिल्ह्यात 300 कर्मचारी आणि 50 अधिकारी असा साडेतीनशे अधिकारी, कर्मचार्‍यांचा ताफा तैनात असणार आहे. गुरूवारचे हे जिल्हा बंद आंदोलन शांततेत करण्यात यावे असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे. तरीही कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. मंगळवारी जिल्ह्यात काही ठिकाणी महामार्ग आणि राज्य मार्गांवर टायर पेटवून आंदोलन करण्यात आले होते. आता गुरूवारी होणार्‍या जिल्हा बंदकडे सार्‍यांचेच लक्ष लागले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आता सारेच मराठा बांधव एकवटले असून आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाहीत असा पवित्रा सकल मराठा समाजाने घेतला आहे.