Sat, Aug 24, 2019 22:28होमपेज › Konkan › शिमगोत्सवात पोटनिवडणुकीचा धुरळा

शिमगोत्सवात पोटनिवडणुकीचा धुरळा

Published On: Feb 12 2018 1:58AM | Last Updated: Feb 11 2018 8:15PMशृंगारतळी : मारुती जाधव

गुहागर तालुक्यातील 27 ग्रा.पं.मध्ये पोट निवडणूक जाहीर झाली असून त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. ही मुदत आता आणखी दोन दिवसांनी वाढवण्यात आली असून ती 12 फेबु्रवारीपर्यंत केली आहे. मात्र, या निवडणुकीमध्ये आतापर्यंत दाखल झालेल्या अर्जानुसार निवडणुकीनंतरही अनेक जागा रिक्‍त राहण्याची शक्यता आहे. ऐन शिमगोत्सवात पोटनिवडणूक जाहीर झाल्याने याचा उत्साह दिसून येत आहे.

गुहागर तालुक्यातील 27 ग्रा.पं.मध्ये पोटनिवडणूक होत आहे. यामध्ये मागील निवडणुकीमध्ये निवडणूक खर्च जाहीर न केलेले अनेक उमेदवार अपात्र ठरल्याने ही निवडणूक लागली आहे. यामध्ये कोळवली, आंबेरे खुर्द, पाचेरीआगर, शिवणे, गोळेवाडी, भातगाव, कुडली, उमराठ, जामसुत, शिर, वेळणेश्‍वर, मळण,  पेवे, पालपेणे, परचुरी, झोंबडी, पाटपन्हाळे, कोसबीवाडी, तळवली, काताळे, काजुर्ली, सडेजांभारी, पाली, पालकोट तर्फे साखरीत्रिशूळ, वरवेली, पडवे अशा 27 ग्रा.पं.मध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

यामध्ये विशेष बाब अशी की कोळवली येथील प्रभाग 3 मध्ये ना.मा.प्र.स्त्री. जागेसाठी आतापर्यंत 5 वेळा निवडणूक कार्यक्रम लागला असला तरी कुणीही अर्ज दाखल केलेले नाहीत. तर शिवणे आंबेरेे खुर्द येथील ना.मा.प्र.स्त्री. व अनुसूचित जाती स्त्री साठी आतापर्यंत सातवेळा निवडणूक कार्यक्रम लागलेला आहे, तरीही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये या रिक्‍त झालेल्या जागांवर महिला उमेदवारांसाठी निवडणूक होणार आहे.
या निवडणुकीत 27 ग्रा.पं. च्या 42 प्रभागातील रिक्‍त झालेल्या 52 जागांसाठी ही निवडणूक होत असून जाहीर झालेल्या नामांकनपत्र दाखल करण्याच्या तारखेपर्यंत फक्‍त 18 अर्ज दाखल झाले आहेत. जिल्हा निवडणूक प्रशासनाने यासाठी 2 दिवसांची मुदत वाढविली असून ती सोमवार, 12 फेबु्रवारी अशी केली आहे. दि.12 रोजी सकाळी 10.30 ते सायं. 6.30 अशी ऑनलाईन अर्ज भरण्याची अखेरची मुदत आहे. या अर्जांची छाननी 14 फेबु्रवारी व अर्ज मागे घेण्याची मुदत आता 16 फेबु्रवारी आहे.  आवश्यक असेल तिथे 27 फेबु्रवारीला मतदान होणार असून 28 फेबु्रवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. 

या 27 गावातील पोटनिवडणुकीबरोबरच गुहागर नगरपंचायतीमधून बाहेर पडलेल्या असगोली ग्रा.पं.ची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. येथील सदस्यांच्या 9 जागांसाठी 8 अर्ज आले असून 1 जागा रिक्‍त राहण्याची शक्यता आहे. सरपंचपदासाठी एकच अर्ज आल्याने सरपंचपदाची थेट निवडणूक बिनविरोध होणार आहे. 

ऑनलाईन अर्ज भरणे,  राखीव जागांची जात प्रमाणपत्रे, महिला उमेदवार अशा कारणांसाठी या निवडणुकीनंतरही पोटनिवडणुकीतील काही जागा रिक्‍त राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.