Tue, Nov 19, 2019 11:34होमपेज › Konkan › कामथेतील अपघातात चिपळूण आगारप्रमुखांसह दोघेजण ठार

कामथेतील अपघातात चिपळूण आगारप्रमुखांसह दोघेजण ठार

Published On: Dec 06 2017 1:45AM | Last Updated: Dec 05 2017 11:10PM

बुकमार्क करा

चिपळूण : खास प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावर कामथे घाटात एस.टी. अपघाताचा पंचनामा करण्यास गेलेल्या चिपळूण आगारप्रमुखांवर काळाने झडप घातली. पंचनामा करीत असताना समोरून कोळसा घेऊन वेगात आलेला डम्पर कलंडला आणि त्याखाली दोघेजण चिरडले गेले. यामध्ये आगारप्रमुख रमेश शिलेवंत (52) आणि बोअरवेल व्यावसायिक  राजू जमादार (38) या दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे चिपळुणात शोककळा पसरली. अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.

हा अपघात मंगळवारी दुपारी 3 च्या सुमारास घडला. त्याआधी महामार्गावरील कामथे घाटात मलकापूर-परेल आणि सावर्डेकडे जाणारी बोअरवेलची गाडी यांच्यामध्ये अपघात झाला होता. यामध्ये एस.टी.चे नुकसान झाले होते. या अपघाताचा पंचनामा करण्यासाठी आगारप्रमुख शिलेवंत बस घेऊन सहकार्‍यांसह घटनास्थळी गेले होते. अपघातस्थळी उतरल्यानंतर पंचनाम्याची कारवाई सुरू होती. सोबत पोलिस पथकही होते. दुपारी तीनच्या सुमारास सावर्डेकडून चिपळूणकडे भरधाव वेगाने येणार्‍या दगडी कोळशाने भरलेल्या डम्परवरील चालकाचा ताबा सुटून हा डम्पर याच ठिकाणी कलंडला. त्यातील दगडी कोळशाच्या ढिगार्‍याखाली आगारप्रमुख शिलेवंत व जमादार हे गाडले गेले. त्यांचे अन्य सहकारी दुसर्‍या बाजूला झाल्याने सुदैवाने ते अपघातातून बचावले.

प्रशासनाची तारांबळ

चिपळूण : खास प्रतिनिधी एस.टी. प्रशासनाची तारांबळ उडाली. अपघातामध्ये दगडी कोळशाखाली कोण गाडले गेले हे स्पष्ट होत नव्हते. अखेर क्रेनच्या साहाय्याने डम्पर बाजूला करण्यात आला. दगडी कोळशाचा ढिगारा उपसण्यात आला. सुरुवातीला राजू जमादार यांचा मृतदेह, यानंतर एक तासाने आगारप्रमुख शिलेवंत यांचा मृतदेह आढळून आला. या नंतर चिपळूण आगारावर शोककळा पसरली. अपघाताचे वृत्त समजताच अनेकांनी कामथेकडे धाव घेतली. कामथे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. घटनास्थळी एस.टी.च्या विभागीय अधिकारी अनघा बारटक्के, जिल्हाप्रमुख सचिन कदम, पं. स. सभापती पूजा निकम, सहा. गटविकास अधिकारी अरुण कदम, एस.टी. कर्मचारी व अधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी पोलिस निरीक्षक प्रदीप मिसर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.