Sat, Apr 20, 2019 10:21होमपेज › Konkan › १०८ रुग्णवाहिका जाळण्याचा प्रयत्न

१०८ रुग्णवाहिका जाळण्याचा प्रयत्न

Published On: Jan 15 2018 1:42AM | Last Updated: Jan 14 2018 11:44PM

बुकमार्क करा

कणकवली : वार्ताहर

कणकवली उपजिल्हा रूग्णालयाच्या आवारात कर्मचारी वसाहतीजवळ उभ्या असलेल्या 108 रूग्णवाहिकेला जाळण्याचा प्रयत्न अज्ञाताकडून करण्यात आला. रूग्णवाहिकेच्या टायरजवळ पेटता बॅनर ठेवण्यात आला होता. चालकाच्या हे लक्षात आल्याने आग विझविण्यात आली. त्यामुळे अनर्थ टळला. ही आग रूग्णालय परिसरातीलच व्यक्तीकडून लावण्यात आल्याचा संशय आहे. याविषयी रूग्णवाहिकेचे डॉक्टर व चालकाकडून कणकवली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कणकवली व परिसरातील रूग्णांना सेवा देण्यासाठी असलेली 108 रूग्णवाहिका उपजिल्हा रूग्णालय आवारातील कर्मचारी वसाहत इमारतीजवळ असलेल्या पार्किंग शेडजवळ थांबवून ठेवली जाते. शनिवारी सायंकाळी रूग्णवाहिका नेहमीप्रमाणे शेडमध्ये उभी करण्यात आली होती. सायंकाळी 7.30 वा. रूग्णवाहिकेवरील चालकाची ड्युटी बदलली. त्यानंतर ड्युटीवर आलेल्या चालक सूर्यकांत गावडे याला रूग्णवाहिकेजवळ काहीतरी पेटत असल्याचे दिसून आले. त्याने पाहणी केली असता रूग्णवाहिकेच्या पुढील चालकाच्या बाजूने असलेल्या टायरखाली बॅनर पेटत असल्याचे दिसून आले. गावडे यांनी प्रसंगावधान राखत पेटता बॅनर बाजूला करत टायरला लागलेली आग विझवली. या रूग्णवाहिकेजवळ उपजिल्हा रूग्णालयाची रूग्णवाहिका व इतर वाहने उभी करून ठेवण्यात आली होती. टायरने पेट घेतला असता तर या सर्वच वाहनांना धोका निर्माण झाला असता. 

उपजिल्हा रूग्णालयाच्या आवारात झालेल्या या प्रकारानंतर रूग्णवाहिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय बुचडे व चालक सूर्यकांत गावडे यांनी याची माहिती उपजिल्हाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिकलगार यांना दिली. रुग्णालयाच्या आवारात बाहेरील व्यक्तींचा फारसा वावर नसतो. त्यामुळे आवारातीलच व्यक्‍तीकडून ही आग लावण्यात आली असावी असा संशय आहे. अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.