Wed, Apr 24, 2019 12:07होमपेज › Konkan › ‘सावित्री’चे काम करणार्‍या ठेकेदाराकडे पुलांची कामे : चंद्रकांत पाटील

‘सावित्री’चे काम करणार्‍या ठेकेदाराकडे पुलांची कामे : चंद्रकांत पाटील

Published On: Sep 09 2018 2:12AM | Last Updated: Sep 08 2018 11:01PMकणकवली : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या दोन दिवसापासून कोकणात येणार्‍या मुंबईकर चाकरमान्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर होईल. गणपतीनंतर दर महिन्याला आपण कोकणात येवून चौपदरीकरणाच्या कामाची पाहणी करणार आहे. जर उर्वरीत भूसंपादनाच्या कामात जनतेने सहकार्य केले तर डिसेंबर 2019 पर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होईल असा विश्‍वास राज्याचे महसूल, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्‍त केला. दिवाळखोरीत गेल्याने ठेकेदार पुलांची कामे अर्धवट सोडून गेले आहेत. अर्धवट राहिलेल्या पुलांच्या कामांसाठी नवीन ठेकेदार एजन्सी नेमली जाणार असून सावित्री पुलाचे काम ज्या ठेकेदार एजन्सीने केले त्या एजन्सीलाच या पुलांची कामे देण्याचा प्रस्ताव आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत आर्थिक सक्षम असलेले ठेकेदार निश्‍चित होवून पुलांची कामे सुरू होतील असेही ना. पाटील यांनी सांगितले. 

ना.चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी चिपळुण ते झाराप यादरम्यान महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाची स्वत: पाहणी केली. त्यानंतर त्यांनी कणकवलीतील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सिंधुदुर्गचे पालकमंत्री  दीपक केसरकर, आ. वैभव नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, प्रदेश चिटणीस राजन तेली, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत यांच्यासह महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता प्रमोद बनगोसावी, सा. बां.चे कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर, प्रांताधिकारी सौ. निता सावंत-शिंदे यांच्यासह तिन्ही विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ना. चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यातील बहुतांश भागातील महामार्गांचे चौपदरीकरणाचे काम हाती घेवून सर्वत्र सिमेंट काँक्रीटचे चांगले रस्ते झाले आहेत. खरे तर कोकणातही हे काम यापूर्वीच प्राधान्याने व्हायला हवे होते. कोकणात खुप पाऊस पडतो त्यामुळे डांबरी रस्ते टिकत नाहीत. यासाठी काँक्रीट रस्त्यांचीच गरज आहे. उशिरा का होईना या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. आम्ही केवळ घोषणा केली नाही तर 15 हजार कोटी रूपयांची तरतूद करून चौपदरीकरणाच्या कामाला गती दिली आहे. इंदापूर ते झाराप या टप्प्यातील दहा पॅकेजेस करून टेंडर आणि वर्क ऑर्डरही काढण्यात आली आहेत. काही ठिकाणी 30-40 टक्के कामही पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी भूसंपादनाला वेळ लागला आहे. मात्र तेही काम लवकर पूर्ण होईल. पनवेल ते इंदापूर या टप्प्यातील महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला विलंब झाल्याने या कामाचा खर्च वाढला. आता त्या ठिकाणी ठेकेदार बदलून कामाला गती देण्यात आल्याचे ना.पाटील यांनी सांगितले.

ते म्हणाले, आपले आजोळ सिंधुदुर्गातील कट्ट्याजवळ आहे. त्यामुळे मुंबईतून गणपतीसाठी येणार्‍या चाकरमान्यांची लगबग आपण जाणून आहे. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आपण मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरूस्तीबाबत मंत्रालयात बैठक घेतली. आठवड्यापूर्वी आपण स्वत: पाहणी केली. त्याचवेळी पुन्हा आपण पाहणी दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते. खरे तर दिल्लीत भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक आहे. तरीही आपण पक्षश्रेष्ठींना विनंती करून कोकण दौर्‍यावर महामार्गाची पाहणी करण्यासाठी आलो. बहुतांश खड्डे भरण्याचे काम पूर्ण झाले आहे. आरवली ते संगमेश्‍वर दरम्यान काम थोडे उशिरा सुरू झाले परंतु तेही आता युध्दपातळीवर सुरू आहे. त्यामुळे गणेशभक्‍तांचा प्रवास निश्‍चितच सुखकर होईल. पुणे-कोल्हापूर येणार्‍या चाकरमान्यांच्या गाड्यांना टोल फ्री सवलत देण्यात आली असून ते पैसे सरकार कंपनीला देणार आहे. डिसेंबर 2019 पर्यंत महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होवून चाकरमान्यांचा मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास सहा ते सात तासात होईल, असा विश्‍वास ना. पाटील यांनी व्यक्‍त केला.

कुडाळमध्ये फ्लायओव्हरची मागणी करण्यात आली आहे. आपण दिल्लीत गेल्यानंतर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून कुडाळ येथील फ्लायओव्हरला मंजुरी देण्याची विनंती करणार आहे, असेही ना. पाटील म्हणाले.