Sat, Apr 20, 2019 09:53होमपेज › Konkan › ‘सिंधुदुर्ग’वरील होडी वाहतूक तीन दिवस बंद

‘सिंधुदुर्ग’वरील होडी वाहतूक तीन दिवस बंद

Published On: Dec 30 2017 12:47AM | Last Updated: Dec 29 2017 10:51PM

बुकमार्क करा
मालवण :  प्रतिनिधी 

सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनने बंदर विभागाला प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले होते; परंतु महिना उलटून गेला तरी बंदर विभागाकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने 30 डिसेंबर ते 1 जानेवारी या तीन दिवसांसाठी किल्ले सिंधुदुर्गवरील प्रवासी होडी वाहतूक सेवा बंद ठेवली जाणार आहे, अशी माहिती किल्ला होडी प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी  पत्रकार परिषदेत दिली.

बंदर जेटी येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी स्वप्निल आचरेकर, आप्पा मोरजकर, बाळा तारी, दादा आचरेकर, दिलीप आचरेकर, राजू पराडकर, काशिराम जोशी, बाळा तारी, प्रसाद सरकारे, अनंत सरकारे, बाळकृष्ण जोशी आदी उपस्थित होते.

श्री. सावंत म्हणाले, बंदरजेटी येथील गाळ कित्येक वर्षे काढलेला नाही. अमावस्या व पौर्णिमा या दरम्यानच्या काळात बंदर जेटीला प्रवासी बोट लावता  येत नाही. त्यामुळे प्रवाशांना किल्ला न पाहता माघारी जावे लागते. तसेच दोन ते तीन बोटींची सांगड करून प्रवाशांना न्यावे लागते. त्याची नाराजी प्रवासी आमच्यावर दाखवतात. मंजूर जेटीच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात होणे महत्त्वाचे आहे. 

पद्मगड ते दांडी या मार्गावर होडी वाहतुकीसाठी देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात यावी. दोन मार्गामधील अंतर किमान 5 ते 10 किलोमीटरचे असावे. प्रमाणपत्रांची वैधता एक वर्षांवरून पाच वर्षे करण्यात यावी. उतारू परवान्याची वैधता एक वर्षांवरून पावसाळी हंगाम वगळता सर्व्हे प्रमाणपत्राच्या आधारे पाच वर्षे करण्यात यावी. थर्ड पार्टी इन्शुरन्स पाच लाखांवरून किमान एक लाखापर्यंत करावा. आयव्ही अंतर्गत प्रवासी संख्या किमान 20 पेक्षा अधिक प्रवासी निर्धारित करावी. प्रवाशांसाठी बांधण्यात आलेला वाहनतळ सुरू करावा. वेंगुर्ले येथील जिल्हा प्रादेशिक अधिकारी कार्यालय जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरी येथे    असावे. नवीन फायबर बोटींना मालवण धक्का ते सिंधुदुर्ग किल्ला मार्गावर परवानगी देण्यात येऊ नये. सिंधुदुर्ग किल्ला येथील नवीन जेटीवर प्रवासी शेड नाही. तसेच बांधण्यात आलेल्या जेटीला सुरक्षित बोट लावता येत नाही. तेथील चॅनल मोकळा करून मिळावा. ऑनलाईन सेवांमुळे सर्व व्यावसायिकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे ही सेवा सुरळीत होईपर्यंत पूर्वीची नोंदणी असलेल्या नौकांना आयव्ही अंतर्गत नोंदणी ऑफलाइन सेवा पुरविण्यात यावी या प्रमुख मागण्यांवर बंदर विभागाने ठोस असा कोणताच निर्णय दिलेला नाही,  असे सावंत यांनी स्पष्ट केले.

पर्यटकांच्या गैरसोयीला शासन जबाबदार
आमच्या समस्यांबाबत आपण पालकमंत्री दीपक केसरकर यांची दोन वेळा भेट घेतली; परंतु त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. पर्यटकांच्या होणार्‍या गैरसोयीला शासनच जबाबदार आहे. होडी सेवा बंद ठेवावी लागत आहे याचे आम्हाला दुःख आहे. आमचा लढा पर्यटक व मालवणवासीयांच्या हितासाठी आहे. सर्वांनी या लढ्याला पाठिंबा देण्याचे आवाहन सावंत यांनी केले.