होमपेज › Konkan › गव्याने केला शेतकर्‍यांचा पाठलाग  

गव्याने केला शेतकर्‍यांचा पाठलाग  

Published On: Mar 24 2018 1:50AM | Last Updated: Mar 23 2018 10:35PMमडुरा : वार्ताहर

पाडलोस - हवालदारवाडी येथे आपल्या बागायतीत गेलेले मोहन गावडे यांचा गव्यांने  पाठलाग केला.  गुरुवारी सांयकाळी हा प्रकार घडला.  भरवस्तीत घडलेल्या या प्रकाराने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.  वनविभागाने या गवारेड्यांचा तात्काळ बदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा  ग्रामस्थांनी दिला आहे. 

गुरुवारी संध्याकाळी  मोहन गावडे आपल्या काजू बागायतीत काजू बी निवडण्यासाठी गेले होते. काजू बी निवडत असताना अचानक त्यांच्या समोर गवा येऊन उभा राहिला. गावडे यांनी प्रंसगावधान राखत पळ काढला असता गव्याने त्यांचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला.  श्री. गावडे यांनी ही माहिती संतोष आंबेकर  व अन्य  ग्रामस्थांना दिल्या नंतर, ग्रामस्थ काजू बागेत गेले. तरही तो गवा बागेत वावरत होता. ग्रामस्थांनी त्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला असता  तो  ग्रामस्थांच्या अंगावर धावून आला. सुमारे अर्धा तासांच्या  प्रयन्तांती  गवा जंगलात निघून गेला. दिलीप आईर, प्रतीक्षा करमळकर, प्रसाद करमळकर, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

दरम्यान, मडुरा गावात गव्यांचा मुक्‍त संचार वाढला असून हे गवे दिवसा ढवळ्या  पिकांची नासधूस करत आहेत.  गुरुवारी रात्रौ  गव्यांच्या कळपाने पाडलोस गावातील मिरची, मका,  चवळी व अन्य पिकांची नासधुस केली.  पाडलोस उपसरपंच महादेव गावडे तसेच तुकाराम शेटकर, हर्षद गावडे यांच्या पिकांचे नुकसान केले. गव्यांचा या उपद्रवाने शेतकरी त्रस्त झाले आहेत. वनविभागाने वेळीच उपाययोजना न केल्यास तालुक्यातील शेतकरी, बागायतदारांसमवेत वनविभाग कार्यालयावर धडकणार असल्याचे शिवसेना उपतालुकाप्रमुख राजू शेटकर यांनी सांगितले.  याकडे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांचे लक्ष वेधणार असल्याचे सांगितले. 

‘तो’ गवा जखमी!  

पाडलोस, मडुरा, रोणापाल गावात फिरणार्‍या गव्यांचा कळपात एक गवा जखमी अवस्थेत असल्याची चर्चा आहे.  रविवारी सायंकाळी शेतकर्‍यांचा पाठलाग करणारा  गवा जखमी  असावा, अशी शक्यता शेतकर्‍यांनी व्यक्‍त केली.  या पार्श्‍वभूमीवर वनविभागाने शेतकरी, बागायतदारांसाठी मडुरा व पाडलोस मध्ये   गस्त ठेवण्याची मागणी होत आहे.

 

Tags : konkan, konkan news, Mathura, bison, farmer,