होमपेज › Konkan › कडाक्याचा उन्हाळा पशु-पक्ष्यांनाही झाला असह्य

कडाक्याचा उन्हाळा पशु-पक्ष्यांनाही झाला असह्य

Published On: Apr 17 2018 1:52AM | Last Updated: Apr 16 2018 10:19PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्याभरात उन्हाचा कडाका कायम आहे. त्यामुळे पशुपक्ष्यांना अन्न आणि पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यावर्षी मार्च, एप्रिल, मे मध्ये तापमान दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा पक्ष्यांना फटका बसत असल्याने दुपारच्या सुमारास नदीपात्रात पक्षी विहार करताना पहावयास मिळत आहेत. तसेच पाणी साठे मोकळे झाल्याने अन्न-पाण्यासाठी पक्षी व प्राणी पाण्यासाठी वणवण करत आहेत.

ग्रामीण भागासह शहरातील  जनजीवन अक्षरश: होरपळून निघाले आहे. अनेक ठिकाणचे पाणवठे, जलसाठे कोरडे पडले आहेत. त्याची झळ अनेक पशु, पक्षी, प्राणी, छोटे मोठे जीवकीटक-कृमी यांना बसू लागली आहे. जमीन मोकळी झाल्याने या प्राण्यांना खायला काहीच उपलब्ध नसल्याचे दिसत आहे. शक्य तो कधी न माणसाळणारे पशुपक्षी सध्या जनमानसात वाडीवस्तीवर येऊन आपली तहान-भूक भागवत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. एप्रिल, मे महिन्यांत कडक उन्हाळा असतो. या उन्हामुळे फक्‍त माणसेच नव्हे तर पक्षी, प्राणीसुद्धा तहानेने व्याकुळ होतात.

नुकतीच वाढू लागलेली छोटी झाडेही पाण्याअभावी जळून जातात. तसेच मोठे झाडही पाण्याअभावी सुकू लागते. झाडांची संख्या घटल्यामुळे उन्हाळ्यात झाडाच्या सावलीत निवारा मिळणे पक्ष्यांना मुश्किल झाले आहे. उन्हाळ्यात सावलीत निवारा न मिळाल्यास प्राणीही हैराण होतात. काही प्राणी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी चिखलात लोळताना दिसतात. जास्त ऊर्जा खर्च झाल्यास आणि पाणी न प्यायला मिळाल्यास पक्षी आणि प्राणी उष्माघाताने मरण्याची शक्यता असते. कधीकधी त्यांच्या शरीरात ग्लुकोज ‘क’ जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होते. उन्हाचा जास्त फटका पक्ष्यांना बसत असल्यामुळे उडताना अचानक खाली पडणे, तारांमध्ये अडकणे अथवा मृत्यू होणे असे गंभीर प्रकार पक्ष्यांबाबत घडताना दिसत आहेत. शहरात हिरवळ व पाण्याचे स्त्रोत कमी होत असून पक्ष्यांच्या घरट्यांवर परिणाम होत आहेत. काहीजण घराशेजारी पक्ष्यांसाठी अन्न, पाण्याची सुविधा करत आहेत.

भूतदयेचे दर्शन...
अनेक ठिकाणी पाणी, अन्नपदार्थ मिळविण्यासाठी पशुपक्ष्यांची गावागावांत येणारी थेट भेट पाहून सामाजिक संस्था, पर्यटक, नागरिक यांच्याकडून या प्राण्यांची, पक्ष्यांची अन्न-पाण्याची व्यवस्था केली जात आहे. यातून भूतदयेचे दर्शन घडत आहे.