होमपेज › Konkan › भिमा-कोरेगावप्रकरणी वेंगुर्लेत निषेध मोर्चा

भिमा-कोरेगावप्रकरणी वेंगुर्लेत निषेध मोर्चा

Published On: Jan 17 2018 1:58AM | Last Updated: Jan 16 2018 9:42PM

बुकमार्क करा
वेंगुर्ले : प्रतिनिधी 

भिमा - कोरेगांव येथील दंगलीचा निषेध नोंदवण्यासाठी वेंगुलेर्र् तालुक्यातील परिवर्तनवादी संघटना व तालुका निषेध मोर्चा कृती समितीच्यावतीने मंगळवारी वेंगुर्ले शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला. भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटे यांना  अटक करा, अशा घोषणा देत दंगली करणार्‍यांवर कडक कारवाई करावी, अशा मागण्यांचेे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी वेंगुर्ले तहसीलदार यांना सादर केले. 

मोर्चा तहसीलदार कार्यालयाकडे आल्यावर त्याचे सभेत रुपांतर झाले. जातीय दंगली घडविणार्‍या वृत्तीचा धिक्‍कार यावेळी मोर्चेकर्‍यांनी केला. दलित-मराठा समाजात तेढ निर्माण करणार्‍या शक्‍तींना रोखण्यासाठी  बहुजन समाजाने  एकत्र आले पाहिजे, असे आवाहन करण्यात आले. पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी भिडे गुरुजींना दिलेले सर्टिफिकेटस दलित विरोधी असल्याच्या आरोप उपस्थित वक्त्यांनी व्यक्‍त केला.  महेश परुळेकर, वाय. जी. कदम,   वासुदेव जाधव, सत्यवान जाधव, वि.रा.आसोलकर, सौ.स्नेहल पालकर यांनी मोर्चास मार्गदर्शन केले. 

वेंगुर्ले तहसीलदार शरद गोसावी यांच्याकडे शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी लेखी निवेदन सादर केले. या दंगलीसाठी जबाबदार भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटे यांना अटक करा, न्यायालयीन चौकशी आयोग स्थापन करुन जलद गतीने तपास करा, गुन्ह्याची सुनावणी जलदगती न्यायालयात करा, विशेष सरकारी वकिलांची नियुक्‍ती करा, गोविंद गायकवाड यांच्या समाधीचे संवर्धन व जतन करावे, सरकारने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास जनतेसमोर आणावा, आदी मागण्यांचे  निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात वेंगुर्ले तालुका निषेध मोर्चा कृती समिती अध्यक्ष सुभाष जाधव, भिवा जाधव, महेश  परुळेकर, सत्यवान जाधव, वासुदेव जाधव, एकनाथ जाधव, वामन कांबळे आदींचा समावेश होता.  सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले तालुक्यातील येथील शेकडो आंबेडकर अनुयायी मोर्चात सहभागी झाले होते.