Fri, Apr 26, 2019 01:21होमपेज › Konkan › 'कोरेगाव भीमाप्रकरणी कुणालाही क्‍लीन चीट नाही'

'कोरेगाव भीमाप्रकरणी कुणालाही क्‍लीन चीट नाही'

Published On: Jan 13 2018 1:12AM | Last Updated: Jan 13 2018 12:52PM

बुकमार्क करा
सावंतवाडी :  प्रतिनिधी 

भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये आपण भिडे गुरुजी किंवा एकबोटे यांना क्‍लीन चीट दिलेली नाही. कोणाविरुद्ध तक्रारी आल्या तर पूर्ण चौकशीशिवाय अटक केली जाणार नाही. भिडे गुरुजींचे वय 84 वर्षे असून गडकिल्‍ले दुरुस्तीसाठी त्यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे त्यांच्यावरील गुन्ह्याबाबत सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असे राज्याचे गृह राज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर  यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले. 

आपण मराठा समाजाबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही, सिंधुदुर्गातील मराठा क्रांती  मोर्चासाठी आपल्या पक्षातील खासदार, आमदारांसह आपण यथाशक्‍ती मदत केली होती. या मोर्चा आंदोलनात वाहतूक खोळंबल्याप्रकरणी संबंधित पोलिसांवर कारवाईही केल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी केले. ते श्रीधर अपार्टमेंट संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते म्हणाले, कोपर्डी प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा अपेक्षित होती. या प्रकरणात सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रयत्न केले. आपण स्वतः गृहखात्याचा मंत्री असल्याने आपल्याच खात्याविरोधात सिंधुदुर्गातील मराठा क्रांती मोर्चात  सहभागी झालो नव्हतो. यासाठी कुठलाही गैरसमज करुन घेऊ नये असे सांगताना त्यांनी कोपर्डीतील आरोपींना फाशीची शिक्षा झाल्यानंतर साधे अभिनंदन करण्याचे सौजन्यही दाखविले नसल्याबद्दल ना. केसरकर यांनी नाराजी व्यक्‍त केली. 

भीमा-कोरेगाव या प्रकरणात चुकीचा मेसेज पसरवलेल्यांची चौकशी केली जाणार आहे. संबंधित हल्‍लेखोरांकडून नुकसान भरपाईही वसूल केली जाणार आहे. वडूबुद्रुकमध्ये खरी घटनेची सुरुवात झाली. छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणारा बॅनर समाजकंटकांनी लावला व प्रकरण भडकत गेले. जरी 50 जणांविरुद्ध अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केला असला तरी केवळ 9 जणांविरुद्ध चौकशीअंती कारवाई झाल्याचे गृहराज्यमंत्री केसरकर यांनी सांगितले.

तीन ते चार लाख लोक दर्शनासाठी येथे आले होते. परंतु, या भाविकांपर्यंत दंगलखोरांना पोलिसांनी पोहोचू दिले नाही. हे चांगले काम पोलिसांनी केले असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले नसल्याबाबतची माहिती चुकीची असून 3 हजार पोलिस तैनात करण्यात आले होते, असेही ना. केसरकर यांनी सांगितले. डाव्या विचारसरणीच्या माणसांनी नक्षलवादाकडे शिरकाव केला आहे. या नक्षलवाद्यांकडे आदिवासी समाजाचा एकही युवक भरती होत नसल्याने नक्षल संघटनांना मोठा धक्‍का बसला असल्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.  

आपण जिल्ह्यात कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात विकासनिधी आणला परंतु, नारायण राणे हे अभिमानाने सांगतात की आपण कॉन्ट्रॅक्टर निर्माण केले. मात्र, राणेंचे हे कॉन्ट्रॅक्टर तीन तीन वेळा निविदा काढूनही त्या भरत नाहीत. यांना रोखण्याचे कोणाचे काम असा सवाल पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केला.याचा जाब समाजविरोधी कॉन्ट्रॅक्टरना जनतेनेे विचारला पाहिजे व यांच्याविरुद्ध जनतेमध्ये चळवळ सुरू व्हायला हवी, असेही ते म्हणाले. खड्डे भरण्याची निविदा निघाली तीही या कॉन्ट्रॅक्टरनी भरली नाही तर 5 ते 10 कोटी रुपयांची निविदा ही मंडळी भरत नाहीत व बाहेरच्या मंडळींना भरण्यापासून आडकाठी करीत असल्याची टीका पालकमंत्री केसरकर यांनी केली.