Thu, Nov 15, 2018 11:42होमपेज › Konkan › ज्या भूमीवर महाराज गेले नाहीत तेथे स्मारक कशासाठी

ज्या भूमीवर महाराज गेले नाहीत तेथे स्मारक कशासाठी

Published On: Dec 26 2017 1:33AM | Last Updated: Dec 25 2017 10:48PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी 3 कोटी खर्च करून सरकारने मुंबई येथील अरबी समुद्रात कातळ शोधले. येथे 6 हजार रुपये खर्च करून महाराजांचे भव्य स्मारक आणि संग्रहालय उभारण्यात येणार आहे. महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी महाराष्ट्रात असताना ज्या भूमीवर महाराज गेले नाहीत तेथे स्मारक उभारण्याचा अट्टहास का? असे परखड मत शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक संभाजी विनायकराव भिडे गुरुजी यांनी व्यक्‍त केले.

पुण्यश्‍लोक छ. शिवाजी महाराज व धर्मवीर छ. संभाजी महाराज यांचे जीवनकार्य तळागाळातील हिंदू बांधवांपर्यंत पोचवण्यासाठी व हिंदू ऐक्यासाठी भिडे गुरुजी यांचे जाहीर व्याख्यान रविवार दि. 24 रोजी सायंकाळी 5.30 वा. आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिर, पटवर्धन हायस्कूल, आठवडा बाजार रत्नागिरी येथे झालेे.

ढोल-ताशांच्या पथकाद्वारे भिडे गुरुजींचे स्वागत करण्यात आले. शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी व्याख्यानाला सुरुवात केली. त्यांनी आपल्या व्याख्यानात 32 मण सुवर्ण सिंहासन पुनर्स्थापना आणि गडकोट मोहीम, श्रीप्रतापगड ते रायरेश्‍वर हे विषय उलगडले. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभिमान आहे. अखंड राज्याचे ते दैवत आहेत. पण काहीजण आपल्या सोयीनुसार त्यांच्या नावाचा वापर करत आहेत. तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांनी पर्यटनाला चालना मिळावी म्हणून महाराजांचे भव्यदिव्य स्मारक उभारावे, अशी भूमिका घेतली.  देशविदेशातले पर्यटक येथे येतील. यामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. अशी धारणा या पाठीमागे सरकारची आहे. पण सरकारची तिजोरी भरण्यासाठी महाराजांचे स्मारक उभारावे इतपत त्यांचे कार्य छोटे आहे का?, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

हे व्याख्यान श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या रत्नागिरी शाखेतर्फे आयोजित करण्यात आले होते. यावेळी शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते.