होमपेज › Konkan › भव्य मिरवणुकीने कनकनगरी झाली भालचंद्रमय!

भव्य मिरवणुकीने कनकनगरी झाली भालचंद्रमय!

Published On: Jan 08 2018 7:29PM | Last Updated: Jan 08 2018 7:21PM

बुकमार्क करा
कणकवली : प्रतिनिधी

‘अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परमहंस भालचंद्र महाराज’ यांचा 114 वा जन्मसोहळा रविवारी हजारो भाविकांच्या मांदियाळीत, विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा झाला. सायंकाळी कणकवली शहरातून भालचंद्र बाबांच्या पालखीची उंट, घोड्यांचा ताफा आणि वारकरी सांप्रदाय यांच्यासमवेत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भालचंद्र बाबांच्या अखंड जयघोषाने सारी कनकनगरी दुमदुमून गेली आणि भालचंद्रमय झाली.

Image may contain: 1 person, indoor

त्यानंतर रात्रीच्या दशावतारी नाट्यप्रयोगाने या जन्मोत्सवाची सांगता झाली. गेले पाच दिवस परमहंस भालचंद्र महाराजांचा जन्मसोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. पहाटेच्या काकड आरतीपासून ते रात्री उशिरापर्यंतच्या विविध कार्यक्रमांना भक्‍तगणांची मोठी उपस्थिती होती.

Image may contain: 3 people, people smiling, people standing

जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातूनच नव्हे तर देश-विदेशातून बाबांचे भक्‍तगण या उत्सवासाठी दाखल झाले होते. पहिले चार दिवस भक्‍तांच्या कल्याणार्थ ‘परमहंस भालचंद्र दत्तयाग’ हा धार्मिक विधी करण्यात आला. रविवारी बाबांचा 114 वा जन्मदिवस होता. यानिमित्त बाबांची समाधी विविधारंगी फुलांनी सजविण्यात आली होती.

Image may contain: 33 people, crowd

पहाटेच्या काकड आरतीला हजारो भाविकांची उपस्थिती होती. त्यानंतर नियमित धर्मिक विधी पार पडले. तद्नंतर वेतोरे येथील ह.भ.प. भाऊ नाईक यांचे परमहंस भालचंद्र महाराज यांच्या जन्मोत्सवाचे कीर्तन झाले. दुपारी 12 वा. ब्रम्हवृंद आणि सुहासिनींच्या उपस्थितीत भालचंद्र महाराजांची प्रतिकात्मक बालमूर्ती पाळण्यात घालून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. जन्मसोहळ्यानिमित्त खास सिंधुदुर्ग पोलिसांचे बँड वाजवण्यात आले. फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.

Image may contain: 2 people, flower

त्यानंतर दुपारची आरती झाली. रविवारी बाबांचा जन्मदिन असल्यामुळे गेल्या चार दिवसांच्या तुलनेत भाविकांची उपस्थिती अधिक होती. दरम्यानच्या काळात जिल्ह्यातील नामवंत भजनी बुवांची भजने झाली. सायंकाळी 6 वा. पासून परमहंस भालचंद्र महाराजांच्या पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला. फुलांनी सजविलेल्या या पालखीत बाबांची तेजस्वी आणि मनोहरी मूर्ती सार्‍यांचेच लक्ष वेधून घेत होती. उंट, घोड्यांचा ताफा आणि वारकरी सांप्रदायाची साथ, सोबत हजारो भाविकांची उपस्थिती अशा माहोलात ढोल ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक सुरू झाली. पालखी मार्गावर पटकीदेवी ते बाजारपेठमार्गे तेलीआळी शिवाजीचौक ते पटवर्धन चौक पुन्हा बाजारपेठेतून संस्थान अशा मार्गावर ठिकठिकाणी शहरवासियांनी सडारांगोळ्या काढून पालखीचे स्वागत केले.
Image may contain: 9 people, people standing