Fri, Aug 23, 2019 14:40होमपेज › Konkan › भालचंद्र बाबांच्या जन्मोत्सवास भाविकांची अलोट गर्दी

भालचंद्र बाबांच्या जन्मोत्सवास भाविकांची अलोट गर्दी

Published On: Jan 05 2018 1:15AM | Last Updated: Jan 04 2018 11:56PM

बुकमार्क करा
कणकवली : प्रतिनिधी

योगियांचे योगी परमहंस भालचंद्र महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे गुरूवारी जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यांतून भाविक भक्‍तांंची अलोट गर्दी लोटली होती. उत्सवाच्या दर दिवशी गर्दीचा उच्चांक वाढतच आहे. या उत्सवामुळे कणकवलीनगरी भालचंद्रमय झाली आहे. 

गडनदी आणि जानवली नदीच्या काठावरून कणकवली नगरीत प्रवेश केल्यानंतर ऐकू येतात ते परमहंस भालचंद्र महाराजांच्या जयजयकाराचे स्वर. कनकनगरीत पाऊल ठेवल्यानंतर बाहेरून येणार्‍या प्रत्येक माणसाचे कर्ण तृप्त होतात. असेच प्रसन्न आणि मंगलमय वातावरण सध्या कनकनगरीत अनुभवायला मिळत आहे. पहाटेच्या काकड आरतीपासून दुपारच्या आरतीपर्यंत आणि दुपारच्या भजनांपासून सायंकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमांपर्यंत विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी भक्तमंडळी हजारोंच्या संख्येने उपस्थित असतात. या जन्मोत्सवानिमित्त भक्तांच्या कल्याणार्थ ‘परमहंस भालचंद्र महाराज दत्तयाग’ या धार्मिक विधीचे आयोजन करण्यात आले आहे. बाबांच्या या उत्सवातील प्रत्येक क्षण हा भक्तांसाठी ‘याची देही याची डोळा मी सद‍्गुरू पाहिले’ असाच असतो. 

गुरूवारी दुसर्‍या दिवशीही हजारोंच्या संख्येने भाविकांनी समाधी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. या सोहळ्याचे वैशिष्ट्ये म्हणजे प्रत्येक भक्‍तगण तन,मन,धन अर्पूण बाबांच्या चरणी आपली सेवा रूजू करत आहे. अतिशय शिस्तबध्दरित्या महाप्रसादाची सेवा ही देखील या उत्सवाचे वैशिष्ट्ये असते. हजारोंच्या संख्येने भाविक दरदिवशी बाबांचा महाप्रसाद घेऊन तृप्त होऊन जात आहेत.  बाबांच्या दरबारात जो जो कोणी आला तो खर्‍या अर्थाने सुखावून गेला, याचीच अनुभुती  भक्‍तगणांना येत आहे.