Mon, Mar 25, 2019 17:27होमपेज › Konkan › मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्याला झोडपले

मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्याला झोडपले

Published On: May 18 2018 1:17AM | Last Updated: May 17 2018 11:06PMरत्नागिरी : प्रतिनिधी

मान्सून पूर्व वादळी पावसाने गुरुवारी (दि. 17) सायंकाळी जिल्ह्याला झोडपून काढले. दुपारनंतर वातावरण ढगाळ झाले होते. सायंकाळी पाच वाजल्यापासून वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. ढगांचा गडगडाट आणि वारा यामुळे पावसाने अक्षरश: झोडपून काढले. याचा फटका अखेरच्या टप्प्यातील आंबा पिकाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. 

वादळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना थोडासा दिलासा मिळाला. परंतु, आंबा बागायतदारांना या पावसाचा जोरदार फटका बसणार आहे. आधीच आंब्याचे दर गडगडत असतानाच त्यातच पावसाने अवकृपा केल्याने आंबा व्यावसायिक अडचणीत सापडला आहे. सायंकाळी चार वाजल्यापासून पावसाने रिपरिप सुरू केली व पाच वाजल्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला. 

रत्नागिरी, संगमेश्‍वर, लांजा, राजापूर या भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सायंकाळी 5.30 नंतर दक्षिण रत्नागिरीतील पाऊस उत्तरेकडे सरकला. उत्तर रत्नागिरीतील चिपळूण, खेड, दापोली, गुहागर, मंडणगड येथेही पाऊस झाला. मात्र, चिपळूणला सायंकाळी पावसाने झोडपून काढले. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. उत्तर रत्नागिरीत वादळी वारा नसल्याने कुठेही नुकसानीचे वृत्त नाही. गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते, उकाडा वाढला होता. या शिवाय हवामान खात्यानेही कोकणात हवामानाचा अंदाज वर्तविला होता. सायंकाळी वादळी वार्‍यासह 
पाऊस सुरू झाल्यानंतर महावितरणने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत केला. यामुळे गैरसोय झाली. महामार्गाच्या चौपदरीकरण कामामुळे अनेक ठिकाणी माती रस्त्यावर वाहून आल्याने महामार्गावर चिखल झाला. विशेषकरुन कामथे (चिपळूण) घाटामध्ये ही परिस्थिती उद्भवली. त्यामुळे या भागात वाहनांची गती मंदावली होती. मात्र, कोकण रेल्वे सेवेवर या पावसाचा कोणताही परिणाम न झाल्याचे समजते. पावसाच्या पार्श्‍वभूमीवर आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहे. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.