Wed, Jul 17, 2019 20:24होमपेज › Konkan › गणेशोत्सवापूर्वी महामार्ग निर्धोक करा : राऊत

गणेशोत्सवापूर्वी महामार्ग निर्धोक करा : राऊत

Published On: Jul 16 2018 11:18PM | Last Updated: Jul 16 2018 10:44PMकणकवली : प्रतिनिधी

कोकणचा लाडका उत्सव असलेल्या गणेशोत्सवात लाखो चाकरमानी आणि हजारो वाहने मुंबई-गोवा महामार्गाने येतात. त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुकर व्हावा यासाठी गणेशोत्सवापूर्वी हा महामार्ग निर्धोक करण्यात यावा, ज्या-ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत ते खड्डे काँक्रिट किंवा हॉटमिक्स डांबराने भरून घ्यावेत, भराव खचला आहे त्याची दुरूस्ती करावी, डायव्हर्शन ठिकाणी वाहनचालकांना दिसतील असे चांगले फलक लावावेत, ज्या ठिकाण़ी मार्ग नादुरूस्त झाला आहे तो दुरूस्त करावा, अशा सूचना खा. विनायक राऊत यांनी महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता प्रमोद बनगोसावी आणि केसीसी बिल्डकॉन कंपनीला केल्या. 

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असताना ठिकठिकाणी महामार्गाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अपघात वाढले आहेत. या पार्श्‍वभूमीवर सोमवारी खा. विनायक राऊत यांनी जानवली पुलापासून खारेपाटणपर्यंत महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनीच्या अधिकार्‍यांसोबत  महामार्गाची पाहणी केली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, शिवसेनेचे जि. प. गटनेते नागेंद्र परब, शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख सचिन सावंत, कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश भोगले, युवासेना जिल्हाप्रमुख अ‍ॅड. हर्षद गावडे, युवा सेना तालुकाप्रमुख राजू राठोड, सोमा गावकर, रमाकांत सावंत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

खा. राऊत यांनी महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांच्या स्पॉटची, खचलेल्या मोर्‍यांची, भरावाची पाहणी केली. त्यानंतर कासार्डे येथे कंपनीच्या कार्यालयात त्यांनी अधिकार्‍यांशी चर्चा करत त्यांना सूचना दिल्या. जानवली ते खारेपाटण दरम्यान 8 कि.मी. काँक्रिटीकरणचे काम पूर्ण झाले असून साडेचार कि.मी. लेनमध्ये वाहतूक सुरू झाली आहे. गणपतीपूर्वी एकूण साडेसात कि.मी. लेनवरून वाहतूक सुरू केली जाईल. तर ओसरगाव ते झाराप दरम्यान 10 कि.मी. काँक्रिटलेनवरून वाहतूक केली जाईल. पावसामुळे महामार्ग वारंवार धोकादायक होतो. त्यामुळे असे स्पॉट पाहून तातडीने त्याची सुधारणा करण्यासाठी खारेपाटण ते झाराप दरम्यान पेट्रोलिंग युनिट सज्ज ठेवण्यात आली आहे. दिवसभर या युनिटची पेट्रोलिंग सुरू असते. हे युनिट आवश्यक सुधारणा करण्याबाबत सुचना करणार आहेत. महामार्गावर डायव्हर्शनच्या ठिकाणी आरसीसी फलक लावण्यात येणार असून त्यावर रेडीयम बोर्ड असणार आहे. सध्या महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे जीएसबी आणि काँक्रिट मटेरियलने भरले जात आहेत. मात्र सततच्या पावसामुळे खड्डे वारंवार पडत आहेत. तरीही पाऊस कमी झाल्यास जास्तीत जास्त महामार्ग खड्डेमुक्त केला जाईल. तसेच हॉटमिक्स प्लांट वापरून बीसीसी लेअर टाकला जाईल, अशी ग्वाही कार्यकारी अभियंता प्रमोद बनगोसावी आणि ठेकेदार कंपनी अधिकार्‍यांनी दिली. 

शहरांना दोन गुणांकाने भरपाई देण्यास राज्य शासनाकडून विलंबग्रामीण भागातील शहरांना दोन गुणांकाने नुकसान भरपाई देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित आहे. मुख्यमंत्र्यांकडे याबाबत आपला पाठपुरावा सुरू आहे. त्याबाबतही लवकरच सकारात्मक निर्णय होईल असे खा. विनायक राऊत यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर सांगितले. 

अपघातग्रस्तांनाही विम्याचे कवच मिळण्यासाठी पाठपुरावा

केसीसी बिल्डकॉन कंपनीने महामार्गाचे चौपदरीकरण काम करत असताना होणार्‍या मालमत्तेच्या नुकसानीपोटी आणि कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी 1 कोटीचा इन्शुरन्स क्‍लेम केला आहे. महामार्गावर गेल्या काही महिन्यात अपघात वाढले असून काहींचे बळी गेले आहेत तर काही जखमी झाले आहेत. त्यामुळे या अपघातग्रस्तांनाही विम्याचे कवच का नाही? असा सवाल पत्रकारांनी खा. राऊत यांना केला असता, केसीसी बिल्डकॉनने ही विमा पॉलिसी कंपनीपुरतीच मर्यादित आहे असे सांगितले असता महामार्गावरील अपघातग्रस्तांनाही विम्याचे कवच मिळावे याकरिता केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही खा. राऊत यांनी
 दिली.