Mon, Jul 22, 2019 01:30होमपेज › Konkan › कुसुमाग्रजांनी मराठीला राजभाषेपर्यंत नेले

कुसुमाग्रजांनी मराठीला राजभाषेपर्यंत नेले

Published On: Feb 28 2018 1:15AM | Last Updated: Feb 27 2018 10:10PMरत्नागिरी : प्रतिनिधी

रोजच्या सरकारी व्यवहारात मराठीला काही स्थानच उरले नव्हते, न्यायालयाच्या दारात ती बिचारी भिकारणीसारखी उभी होती. अशा मराठीला आपल्या साहित्य सेवेतून न्याय मिळवून देण्याचे काम कवीवर्य कुसुमाग्रजांनी केले, म्हणून 1997 साली मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला, असे गौरवोद्गार कीर्तनकार प्रिया पुरोहित यांनी काढले. जनसेवा ग्रंथालय आयोजित मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत मराठी भाषा गौरव कीर्तन कार्यक्रम पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

राणी लक्ष्मीबाई सभागृहात रविवार, दि.25 फेब्रु. रोजी कीर्तनप्रेमी आणि मराठी भाषाप्रेमींच्या प्रतिसादात हा कार्यक्रम पार पडला. कीर्तनाच्या पूर्वरंगात पुरोहित यांनी मराठी भाषा आणि शब्द सामर्थ्य यांचे निरूपण केले. महानुभव पंथ ते वारकरी संप्रदाय अशी विकसित होत गेलेली मराठी भाषा उदाहरणासहित प्रेक्षकांसमोर मांडली. ‘आम्हा घरी धन.. शब्दांचीच रत्ने..’ या तुकोबांच्या लोकप्रिय अभंगाने कीर्तनाची सुरूवात झाली. या अभंगाआधारे मराठीचा महिमा त्यांनी श्रोत्यांसमोर मांडला. 

कथाभागात कुसुमाग्रज तथा शिरवाडकरांची जीवनकथा मांडली. कुसुम या लहान बहिणीपेक्षा गजानन मोठे, म्हणून त्यांना कवी माधव ज्युलियन यांनी कुसुमाग्रज हे नाव दिले. नाईक मास्तरांमुळे त्यांच्यात लहानपणापासूनच देशभक्‍तीचे बीज रोवले गेले. त्यातूनच बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात त्यांनी सहभाग घेतला होता. पुढे ते कविता लिहू लागले आणि त्यांचा पहिलाच ‘विशाखा’ हा कवितासंग्रह वि.स.खांडेकर यांनी काढला. कुसुमाग्रजांची कविता ही लाजवणारी नाही, तर ती आंतरमनाला चेतवणारी आहे. त्यांनी कवितेत व्यक्‍त  केलेली प्रेमभावना ही लोचट नाही, तर ती पुरूषार्थावर प्रेम करणारी आहे, हेच पृथ्वीचे प्रेमगीत या कवितेतून ते प्रतित होते. त्यांच्या कवितेत नाट्य आहे.. क्रांतीचा संदेश आहे. 

‘म्यानातून उसळे..’ या सारख्या गीतातून त्यांनी शिवचरित्रही मांडले. बालकविताही लिहल्या. नटसम्राटसारख्या नाटकांतून त्यांनी वृद्धाची व्यथा मांडली. एक होती वाघीण, कौंतेय अशी अनेक नाटके त्यांनी लिहिली. विशाखा या काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळाला. अशा या कविश्रेष्ठामुळे मराठीचा अंध:कार दूर झाला. भाषेचे वैभव वाढले. भाषा ही जगजननी आहे, अशा भाषेची सेवा कुसुमाग्रजांनी केली, म्हणून त्यांचे साहित्य सर्वत्र पोहोचले. तीच त्यांची तळमळ घेऊन आपण मराठीसाठी काहीतरी करण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले.