Wed, Dec 11, 2019 11:56होमपेज › Konkan › कोयनेचे अवजल ठरलेय ‘जीवन’

कोयनेचे अवजल ठरलेय ‘जीवन’

Published On: May 21 2019 1:49AM | Last Updated: May 20 2019 11:18PM
चिपळूण : खास प्रतिनिधी 

कोयना वीज प्रकल्पाच्या अवजलामुळे चिपळूण परिसरातील गावांची तहान भागली आहे. जर या पाण्याचा पुरवठा झाला नसता तर चिपळूण सह परिसरातील लाखो लोकाना पाणी -पाणी करण्याची वेळ आली असती. 

कोयना वीज प्रकल्पासाठी दरवर्षी कोयना धरणातून 67  टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरण्यात येते. वर्षभरात पाण्याचा हा कोटा वापरला जातो. कोयनेच्या चार टप्प्यांतून वीज निर्मिती झाल्या नंतर अवजल कालव्याद्वारे वाशिष्ठी नदीत सोडण्यात येते. हे पाणी मुंबई, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र व कोकणात फिरवावे या वरून अनेक मतभेद आहेत. कोकण कृषी विद्यापिठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी कोयनेचे अवजल कोकणात खेळवावे या विषयावर विस्तृत अभ्यास करून शासनाला अहवाल दिला आहे. कोयनेचे अवजल या विषयावर आजपर्यंत अनेकांनी अभ्यास केला आहे.  मात्र,  शासनाने या अहवालाची अद्याप दखल घेतलेली नाही. 

वाशिष्ठी नदीत सोडले जाणारे अवजल चिपळूण परिसरातील लोकांसाठी वरदान ठरले आहे. या पाण्यावर शेती होत नसली तरी परिसरातील पाणीटंचाई मात्र कायमची मिटली आहे. त्यामुळे कोयनेचे अवजल चिपळूणसाठी जीवन बनले आहे. कालव्याद्वारे कोयनेचे अवजल वाशिष्ठी नदीला पिंपळी येथे मिळते.  या अवजलावर पोफळीपासून सुरु होणारी गावे अवलंबून आहेत. 

पोफळी, कोंडफणसवणे,  अलोरे,  पेढांबे, नागावे, कोळकेवाडी, शिरगाव, पिंपळी, सती,  खेर्डी,  दळवटणे, कळंबस्ते,  वालोपे, चिपळूण शहर, मिरजोळी या गावाबरोबर खेर्डी, गाणे-खडपोली आणि लोटे एमआयडीसी व परिसरातील गावांना हेच पाणी पुरविले जाते. या भागातील  गावांच्या पाणीपुरवठा योजना वाशिष्ठी नदीकिनारी बांधण्यात आल्या आहेत. अनेक जॅकवेल याच नदीच्या किनारी आहेत. कोयनेचे अवजल वर्षभर सोडले जात असल्याने या भागाची तहान भागली जात आहे. हिवाळ्याच्या दिवसात विजेची मागणी घटल्याने वीजनिर्मिती कमी होते. परिणामी या दिवसात अवजल कमी प्रमाणात सोडले गेल्यास या परिसरात पाण्याचा प्रश्‍न निर्माण होतो.

वाशिष्ठी नदीतील याच पाण्यावर अंजनवेल येथील आरजीपीपीएल हा प्रकल्प अवलंबून आहे. तीन एमआयडीसी आणि शेकडो गावे याच पाण्यावर अवलंबून असल्याने  कोयनेचे पाणी या भागासाठी जीवन ठरले आहे. त्यामुळे हे पाणी अन्यत्र वळविण्याचा विचार झाल्यास ओद्योगिक वसाहतीसह अनेक गावांचा घसा कोरडा पडेल, याचा विचार गांभीर्याने करणे आवश्यक आहे.